विषबाधा झाल्याने जुळ्या चिमुकल्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:58 PM2019-02-08T19:58:45+5:302019-02-08T20:05:32+5:30
उजनी येथील घटना; तिघींवर उपचार सुरु
उजनी (जि. लातूर) - औसा तालुक्यातील उजनी येथे पाच मुलींना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील दोन जुळ््या बहिणींचा दुपारी मृत्यू झाला. तर अन्य तिघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नेमकी विषबाधा कशातून झाली हे मात्र समजू शकले नाही.
उजनी येथील आयुब रशिद रुईकर (४५) यांना पाच मुली आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलींना दूध देण्यात आले होते. पाचपैकी तिघींजणी शाळेत गेल्या होत्या. दरम्यान, काही वेळानंतर त्यांना मळमळ व जुलाब सुरु झाले. उलट्या सुरु झाल्याने पालक आयुब रुईकर यांनी त्यांना तातडीने उजनी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन वर्षाच्या जुळ््या असलेल्या मारिया व आलमास या चिमुकलीचा मृत्यू झाला. मारिया हिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेवून जात असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. तर आलमास हिला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. यातील अल्फिया (१२) हिच्यावर उजनी येथे तर महेक (११) आणि सुहाना (८) यांच्यावर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी...
उजनी येथे विषबाधेची घटना घडल्याची माहिती मिळताच औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच विषबाधा नेमकी कशातून झाली, याबाबत चौकशी केली.