गोरेगावात विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:45 PM2018-09-25T20:45:45+5:302018-09-25T20:46:17+5:30
कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीत निदर्शनास आलं. त्यानुसार वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.
मुंबई - गोरेगाव परिसरात विजेचा धक्का बसल्याने एका ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटनाकाल संध्याकाळी घडली. रामसिंगार यादव असं या मृत कामगारचं नाव असून या कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीत निदर्शनास आलं. त्यानुसार वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.
मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेले रामसिंगार यादव हे मागील अनेक महिन्यांपासून वालभट्ट रोडच्या राजीव गांधी नगर येथील कामा इस्टेटमध्ये साई रबर कंपनीत कामाला होते. सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते रबर मोल्डिंग इलेक्ट्राॅनिक हॅडस्प्रे मशीन चालू करण्यासाठी गेले. त्यावेळी विद्युत पुरवठा करणाऱ्या बाॅक्समध्ये चुकीच्या इलेक्ट्रिक वायरच्या जोडणीमुळे मागील अनेक दिवसांपासून स्पार्क होत होता. मात्र, तरी देखील त्याची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. मशीन चालू करण्यासाठी गेलेल्या यादव यांनी मशीनला हात लावताच विजेच्या झटक्याने ते मागे फेकले गेले. या दुर्घटनेत यादव बेशुद्धावस्थेत कोसळले. त्यावेळी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळील शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी यादव यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून एकाला अटक केली आहे.