खाणीचा मलबा कोसळून दोघे ठार : नागपूरनजीकच्या गुमगाव मॉयलमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 09:06 PM2020-01-23T21:06:13+5:302020-01-23T21:10:16+5:30
मॅगनीज खाणीच्या ‘शॉप्ट’ खोदण्याचे काम सुरू असतानाच वरचा भाग (मालबा) कोसळला आणि त्याखाली दबल्याने दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर ): मॅगनीज खाणीच्या ‘शॉप्ट’ खोदण्याचे काम सुरू असतानाच वरचा भाग (मालबा) कोसळला आणि त्याखाली दबल्याने दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृत व जखमींमध्ये प्रत्येकी एका चिनी कामगाराचा समावेश आहे. ही घटना गुमगाव (ता. सावनेर) येथील मॅगनीज ओर इंडिया (मॉयल)च्या खाणीत बुधवारी (दि. २२) रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान घडली.
पंकज खुशाल चौरेवार (२५, रा गडेगाव, ता. सावनेर) व चॅन गुंग येईय (३१, चीन) अशी मृत कामगारांची नावे असून, जखमींमध्ये अनिल देवमन बागडे (२१, रा. कोच्छी, ता. सावनेर) व वॉग युन शॉन (३०, चीन) या दोन कामगारांचा समावेश आहे. मॉयलच्या गुमगाव खाण अंतर्गत येणाऱ्या तिघई (ता. सावनेर) परिसरात बुधवारी सकाळी १७३ मीटर अंतरावरील ‘शॉप्ट’च्या खोदकाम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी १० ते १२ कामगार नियुक्त करण्यात आले होते.
सर्व कामगार खोदकाम करीत असतानाच ‘शॉप्ट’च्या वरचा भाग कोसळला. त्याच्या मलब्याखाली चौघेही दबल्या गेले. उर्वरित कामगार थोडक्यात बचावले. माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी चौघांनाही मलब्याखालून बाहेर काढले. मात्र, पंकज चौरेवार व चॅन गुंग येईय या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर अनिल बागडे व वॉग युन शॉनीे दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मॉयल प्रशासनाने व्यवस्था केली.
या घटनेमुळे खाण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय, मॉयल प्रशासनाने या घटनेबाबत गुप्तताही पाळली होती. दुसरीकडे, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. खाणीतील अपघात व अनुचित घटना टाळण्यासाठी मॉयल प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, कामगारांच्या संरक्षणासाठी कोणत्या योजना राबविल्या जातात याबाबत चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या प्रकरणी खापा (ता. सावनेर) पोलिसांनी भादंवि ३०४ (अ), ३३७ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार हर्षल एकरे करीत आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
मृत पंकज चौरेवार हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने व बहिणीचे लग्न झाल्याने घरी आई एकटीच आहे. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी त्याच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एकाला मॉयलमध्ये नोकरी देण्याची आग्रही मागणी केली होती. खाणीच्या प्रवेशद्वाराजवळ १५० ते २०० नागरिक जमा झाल्याने तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर मॉयलच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्याची ग्वाही दिल्याने तणाव निवळला.
‘शॉप्ट’ खोदण्याचे कंत्राट चिनी कंपनीला
मॉयलमधील ‘शॉप्ट’ खोदण्याचे कंत्राट चायना कोल नंबर थ्री (सीसी ३) मार्फत कॉन्दूक्शन कॉर्पोरेशन ग्रुप लिमि. या चायनीज कंपनीला दिले आहे. सदर कंपनीने या कामासाठी मॉयलसोबत १५ फेब्रुवारी २०१८ रोजी करार केला होता. हा करार तीन वर्षाचा आहे. पंकजसह इतर स्थानिक त्या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. ही कंपनी चिनी कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ तर स्थानिक कामगारांना अत्यल्प वेतन द्यायची.