भररस्त्यात कपडे उतरवले, साडी नेसवली; 'चोर' असल्याची पाटी हाती देत व्यापाऱ्याची धिंड काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 11:26 AM2021-07-17T11:26:03+5:302021-07-17T11:27:02+5:30
आरोपी व्यवसायिक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल
सूरत: थकवलेले पैसे न देणाऱ्या एका व्यापाऱ्याची कपडे काढून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातच्या सूरतमध्ये घडला आहे. सूरतच्या रिंग रोडवरील न्यू टीटी मार्केटमध्ये ही घटना घडली. पीडित व्यापाऱ्याचे कपडे काढून त्याच्या कमरेला साडी बांधण्यात आली. त्याच्या हातात चोर अशी पाटी देण्यात आली. त्यानंतर त्याला परिसरात फिरवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यवसायिकाला अटक केली आहे.
तमिळनाडूतील एक व्यापारी सूरतमधील टीटी मार्केटमध्ये आला होता. त्यानं चंद्रकांत जैन नावाच्या व्यवसायिकाकडून ४ लाख रुपये घेतले होते. मात्र ते परत केले नव्हते. तमिळनाडूतील व्यापारी मार्केटमध्ये आल्याची माहिती जैन यांना मिळाली. त्यांनी त्या व्यापाऱ्याला शोधून काढलं. आरोपी व्यवसायिक आणि त्याच्या साथीदारांनी व्यापाऱ्याला कपडे काढायला लावले. ५५ वर्षीय व्यापाऱ्याचे कपडे काढून जैन यांनी त्यांना परिसरात फिरवलं. त्यावेळी त्याच्या कमरेला साडी बांधण्यात आली. पीडित व्यापाऱ्याच्या हातात चोर शब्द असलेली पाटीदेखील देण्यात आली.
मार्केटमधील शेकडो लोकांनी हा प्रकार पाहिला. पीडित व्यापारी मान खाली घालून मार्केटमध्ये चालत होता. लोक त्याचे फोटो, व्हिडीओ काढत होते. मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावलं नाही. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. मात्र पीडित व्यापारी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आला नाही. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च तक्रार नोंदवून घेतली. आरोपी व्यवसायिक जैन आणि त्याच्या २ साथींदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवा आणि सोहम अशी त्यांची नावं आहेत.