Deepali Chavan suicide case: "प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही; शेवटी व्यवस्थेने घेतला बळी"; पतीने व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 01:55 PM2021-03-26T13:55:47+5:302021-03-26T13:58:04+5:30
Deepali Chavan suicide case: वरिष्ठ अश्लील बोलले हे सर्व सुसाईड नोटमध्ये लिहिलंय आहे, अशी खंत दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.
धारणी (अमरावती) : महिला आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी डीएफओला अटक करण्यात आली असून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. मला तिने सांगितलं होतं, तिला वरिष्ठांनी रडवले. सर्वांसमोर तिचा स्वाभिमान दुखावला. शेवटी तिने हा निर्णय घेतला. ऍट्रॉसिटी तिच्यावर दाखल करायला लावला, तिच्यावर वेगवगेळ्या चार्जशीट फाईल करायला लावल्या. प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही. शेवटी व्यवस्थेने तिचा बळी घेतला. सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलंय तिच्यासोबत जे घडलंय ते इतरांशी घडायला नको, म्हणून संबंधितांना अटक झाली पाहिजे ही तिची शेवटची इच्छा आहे. वरिष्ठ अश्लील बोलले हे सर्व सुसाईड नोटमध्ये लिहिलंय आहे, अशी खंत दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.
प्रामाणिकपणे काम करून काहीच मिळालं नाही. शेवटी व्यवस्थेने तिचा बळी घेतला; दीपाली चव्हाण यांच्या पतीने व्यक्त केला संताप pic.twitter.com/uyrU9V4oEm
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2021
मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मृत चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास धारणी पोलिसांनी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. अमरावती येथील इर्विन चौकात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दीपाली यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु आहे. दरम्यान दीपाली यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्याबाबत त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद आहे. या प्रकरणाने वनविभागात मोठी खळबळ माजली आहे. आएफएस व नॉन आयएफएसचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे.
Deepali Chavan suicide case: दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमारला अटक
दीपाली चव्हाण यांच्या नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार pic.twitter.com/DfHFX0nJAz
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2021