Deepali Chavan Suicide Case : अचलपूर न्यायालयात श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज; पोलिसांना ‘से’ मागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:46 PM2021-05-03T20:46:59+5:302021-05-03T20:52:13+5:30
Deepali Chavan Suicide Case : रेड्डी यांना नागपूर येथून बुधवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली होती.
परतवाडा (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन अर्ज सोमवारी वकिलांमार्फत अचलपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला. रेड्डी यांना नागपूर येथून बुधवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली होती.
धारणी न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर १ मे रोजी त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दोन दिवसांपासून रेड्डी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या तात्पुरत्या कारागृहात आहेत. सोमवारी त्यांचे वकील दीपक वाधवानी यांनी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगळवारी हा जामीन अर्ज पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश सागर मुनगीलवार यांच्या न्यायालयात गेल्यानंतर पोलिसांना जामीनसंदर्भात ‘से’ दाखल करण्याचे सांगण्यात येणार आहेत. याच न्यायालयात श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.