Deepali Chavan Suicide Case : विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट; दुसरी रात्रही पोलीस कोठडीत, महिला अधिकाऱ्याकडे तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:23 PM2021-03-28T18:23:49+5:302021-03-28T18:25:30+5:30
Deepali Chavan Suicide Case: पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
धारणी (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याची सलग दुसरी रात्र धारणी ठाण्याच्या कोठडीत गेली. मात्र, पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
विनोद शिवकुमार बाला याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेऊन धारणी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे शुक्रवारची रात्र त्याला धारणी पोलीस ठाण्यात काढावी लागली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २९ मार्चपर्यंत पीसीआर सुनावण्यात आला. त्यानंतर शनिवार व लागोपाठ रविवारची त्याची रात्रदेखील सामान्य कैद्याप्रमाणे पोलीस कोठडीत जाणार आहे.
धारणी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश एम. एस. गाडे यांनी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी २ नंतर धारणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सामान्य कैद्याप्रमाणे त्याला ठेवण्यात आले होते. जेवायला शासकीय डबा देण्यात आला. त्यानेही बाहेरचे जेवण किंवा इतर काही वस्तूची मागणी केली नाही. पोलीस कोठडीजवळ ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी असे पाच जण तैनात ठेवले आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी रात्री चौकशी केली असता, त्याने काहीही कबुली दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेचा तपास महिला एसडीपीओंकडे
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांच्याकडे होता. ते ३१ मार्चला सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची मागणी झाल्याने विशेष महिला पोलीस तपास अधिकारी म्हणून मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.
Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांना मदत करता न आल्याने खंत; नवनीत राणा यांना अश्रू अनावर
Deepali Chavan Suicide Case: दीपालीच्या आत्महत्येवळी शिवकुमार हरिसाल परिसरात होता; निवासस्थानी गेला, फ्रेश झाला अन्...
आरोपीला तपासकामी चिखलदऱ्याला नेले
गुगामाल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदरा येथे असून, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बालाचे शासकीय निवासस्थानसुद्धा तेथेच आहे. कार्यालयीन कागदपत्रे व निवास्थानाहून त्याचा लॅपटॉप व गुन्ह्या संबंधित इतरही काही वस्तू जप्त करण्याकरिता त्याला रविवारी दुपारी २ वाजता दरम्यान चिखलदरा येथे नेण्यात आले.
अन्य वनपरिक्षेत्रातील अधिकारी शांत का?
गुगामल वन्यजीव विभागांतर्गत चिखलदरा, ढाकणा व तारुबांदा येथील तिन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी मौन साधले आहे. त्यांच्याकडून साधा निषेधही केला गेला नाही. त्यांचे मौन अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.