Deepali Chavan Suicide: निलंबित डीएफओ शिवकुमारला कोठडी; न्यायालयाबाहेर लोकांचा संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:13 AM2021-03-28T02:13:21+5:302021-03-28T06:08:18+5:30
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण - अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
धारणी (जि. अमरावती) : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित डीएफओ विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तोंडातून ‘ब्र’देखील काढला नाही. शनिवारी त्याला प्रथम न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश गाडे यांनी आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्याला कडक बंदोबस्तात धारणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आरोपीला न्यायालयात पायी न्या
आरोपी शिवकुमार याने दीपाली चव्हाण यांना गर्भावस्थेत जंगलात पायीव फिरविले. त्याचप्रमाणे शिवकुमारलादेखील वाहनातून न नेता पायीच न्यायालयात न्या, असा आग्रह वनविभागातील महिला कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धरला. मात्र, जनसंताप पाहता शिवकुमारला पोलीस व्हॅनमधून आणण्यात आले.
शिवकुमारबद्दलचा संताप अनावर झाल्याने लोक शिवकुमार मुर्दाबादचे नारे गुंजले. न्यायालयाबाहेर एकच गर्दी झाली होती. कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील लोकही आले होते.
शिवकुमारला फाशी द्या
शिवकुमारमुळे दीपाली चव्हाण यांचा गर्भपात झाला. त्या आत्महत्येवेळी गर्भवती होत्या. त्यामुळे ते एक नव्हे तर तीन जीव जाण्यास जबाबदार आहेत. शिवकुमारला फाशीच द्यावी, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी केली.