राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आळंदीतील महाराजाकडून सोशल मीडियावर बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 08:43 PM2020-07-20T20:43:13+5:302020-07-20T20:44:13+5:30
आळंदीतील महाराजाने त्याच्या फेसबुकवरून बदनामीकारक पोस्ट केली होती.
आळंदी (शेलपिंपळ्गाव) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोशल मीडियाद्वारे खालच्या स्तरावर भाषा वापरून बदनामी केल्याबाबत आळंदीतील संग्राम भंडारे या महाराजावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आळंदीतील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आळंदी पोलिसांकडे केली आहे. जर, संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास याविरोधात आळंदी बंदचे आवाहनही करण्यात आल्याचे पत्र सोबत देण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित महाराज आळंदीतून परागंदा झाले आहेत.
याबाबत सोमवारी (दि.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे , महिला अध्यक्षा पुष्पा कुऱ्हाडे , संदिप नाईकरे, योगेश सातपुते यांनी आळंदी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांना निवेदन दिले. आळंदीतील संग्राम भंडारे याने नुकतेच त्याच्या फेसबुकवरून बदनामीकारक पोस्ट केली होती. त्याला शोधण्यासाठी कार्यकर्ते आळंदीतील घरी गेले असता तो बाहेर गेल्याचे तेथील वॉचमनने सांगितले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठांना कारवाईबाबतचे निवेदन दिले.
याबाबत आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, संबंधित महाराज नाशिकला गेला आहे. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर सोशल मीडियावरून त्याने ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र, दोन दिवसांनी तो आळंदीत आल्यावर त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.