देहूरोड पोलिसांनी केल्या सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:07 PM2019-08-20T19:07:49+5:302019-08-20T19:08:26+5:30
देहूरोड ,रावेत ,भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी तिघा चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत.
देहूरोड : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांकडून देहूरोड पोलिसांनी अडीच लाख किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील एका फरार गुन्हेगाराचा शोध घेत आहेत .
अक्षय राजू शेळके ( वय ३३ , रा. सोमाटणे फाटा ,ता. मावळ ), कार्तिक लक्ष्मण आढे ( वय १९ , रा.चौराई नगर ,सोमाटणे फाटा, ता. मावळ ) आणि सनी मनोज रॉय ( वय १९ , रा .थॉमस कॉलनी ,देहूरोड ) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे असून सराईत गुन्हेगार सादिक शेख ( रा.साईनगर ,मामुर्डी ) हा फरार आहे .
देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी संकेत घारे व किशोर परदेशी यांना त्यांच्या खबऱ्याकडून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर .के .पद्मनाभन, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील , देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाने
पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार ,पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप ,सहायक फौजदार सुभाष सावंत, पोलीस हवालदार प्रमोद सात्रस ,पोलीस कर्मचारी परदेशी ,घारे ,सचिन शेजाळ, अनिल जगताप ,नारायण तेलंग आदींनी सापळा रचुन अक्षय ,कार्तिक आणि सनी असे तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली आहे. यात देहूरोड ,रावेत ,भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी तिघा चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत.यापैकी ३ देहूरोड पोलीस ठाणे व १ दुचाकी भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या तिघांचा साथीदार शेख अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .मंदिरातील दानपेटी चोरणे, दुचाकी चोरणे ,हाणामाऱ्या असे गुन्हे त्यावर दाखल आहेत. अधिक तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले आहे.