VIDEO: ५ सशस्त्र रक्षकांचा पहारा असताना 'तो' पीपीई किटमध्ये आला अन् १३ कोटींचे दागिने लुटून गेला
By कुणाल गवाणकर | Published: January 21, 2021 01:23 PM2021-01-21T13:23:23+5:302021-01-21T13:25:32+5:30
१३ कोटींचे दागिने घेऊन चोरटा पसार; पोलिसांकडून २४ तासांत अटक
दिल्ली: एका ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख नूर असं आरोपीचं नाव असून त्यानं दिल्लीतल्या कालाकाजी परिसरातील अंजली ज्वेलर्समध्ये चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून १३ कोटी रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. मोहम्मदनं ज्वेलर्समधून तब्बल २५ किलो सोनं चोरुन पोबारा केला होता. मोहम्मद पीपीई किट घालून ज्लेवर्समध्ये शिरला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शेख नूर दुसऱ्या इमारतीवरून आत शिरला होता. शोरूमच्या मागे-पुढे ५ सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र तरीही यातल्या कोणालाही चोर आल्याचा सुगावा लागला नाही. चोरानं दागिने बॅगेत भरले आणि ती बॅग रिक्षातून नेली. फिल्मी स्टाईलनं करण्यात आलेली ही चोरी यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी चोरी आहे.
#WATCH | A man dressed in a Personal Protective Equipment(PPE) kit engages in theft in a jewellery shop in the Kalkaji area of Delhi
— ANI (@ANI) January 21, 2021
Visuals from the CCTV footage of the shop pic.twitter.com/cWQph6k4IJ
अटक करण्यात आलेला आरोपी हुबळीचा रहिवासी आहे. तो कालकाजीमध्ये इलेक्ट्रिशन म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आग्नेय दिल्लीतल्या कालाकाजी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अंजली ज्वेलर्समध्ये त्यानं चोरी केली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोराला पकडण्यात यश मिळवलं.
अंजली ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ माजली. आसपास राहणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली. दुकानाच्या मागे-पुढे सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात असूनही त्यांना कोणतीही चाहूल लागली नाही. चोरानं अतिशय चलाखीनं चोरी केली आणि दोरीच्या मदतीनं पसार झाला. ही घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.