"माझा छळ करण्यात आला, पत्नी १० लाख मागतेय, हे शेवटचं..."; पुनीतचा ५४ मिनिटांचा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:06 IST2025-01-03T11:05:23+5:302025-01-03T11:06:02+5:30
Puneet Khurana : पुनीतने आपल्या मोबाईलमध्ये ५४ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते.

"माझा छळ करण्यात आला, पत्नी १० लाख मागतेय, हे शेवटचं..."; पुनीतचा ५४ मिनिटांचा Video
दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील कॅफे मालक पुनीत खुरानाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पुनीतने आपल्या मोबाईलमध्ये ५४ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते. व्हिडीओमध्ये पुनीतने सांगितलं की, माझा खूप छळ करण्यात आला आणि घटस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जात नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हिडीओमध्ये पुनीत स्पष्टपणे म्हणतो, मी आत्महत्या करत आहे कारण माझी पत्नी आणि सासरचे लोक मला खूप त्रास देत आहेत. आम्ही आधीच परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि कोर्टात अटींवर स्वाक्षरीही केली होती, पण आता नवीन अटी सांगून ते माझ्यावर दबाव आणत आहेत. तसेच सासरचे लोक १० लाख रुपयांची वेगळी मागणी करत आहेत जे मी देऊ शकत नाही. मला माझ्या आई-वडिलांना आणखी त्रास द्यायचा नाही.
पोलिसांनी पुनीतच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले आणि त्याचा मोबाईल फोन आणि इतर वस्तू जप्त केल्या. उत्तर-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त भीष्म सिंह यांनी पुनीतचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची पुष्टी केली. पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत असून पुनीतच्या पत्नीला आणि सासरच्या मंडळींना चौकशीसाठी बोलावू शकतात. पोस्टमॉर्टमनंतर पुनीतचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याप्रकरणी पुनीतची पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून या तपासातून या आत्महत्येमागे नेमकं कारण काय होतं हे उघड होऊ शकतं. या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलीस तपास करत असून व्हिडिओच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल असं सांगत आहेत.