‘त्या’ फाटक्या नोटेनं उलगडलं दुहेरी हत्याकांडाचं कोडं; आईलेकाची हत्या करणाऱ्याला २४ तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:25 PM2021-07-08T13:25:46+5:302021-07-08T13:27:42+5:30
मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या पालम विहार परिसरात २७ वर्षीय गौरव आणि त्याची आई बबिता यांची हत्या करण्यात आली होती
नवी दिल्ली – राजधानीच्या दिल्लीच्या पालम गावात एअरफोर्स कर्मचाऱ्याच्या मुलाची आणि पत्नीची हत्या झाल्याने खळबळ माजली होती. या हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. ही हत्या दुसऱ्या कुणी केली नसून खुद्द पीडित कर्मचाऱ्याच्या मेव्हण्याच्या मुलाने केली आहे. हत्येमागे आर्थिक व्यवहार असल्याचं समोर आलं आहे. एका ३० रुपयाच्या फाटलेल्या नोटेवरून पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.
मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या पालम विहार परिसरात २७ वर्षीय गौरव आणि त्याची आई बबिता यांची हत्या करण्यात आली होती. एअरफोर्समध्ये असलेले स्वरुप सुधीर जेव्हा त्यांच्या कार्यालयातून घरी पोहचले तेव्हा पत्नी आणि मुलाची हत्या झाल्याचं त्यांना दिसून आले. गौरव हैदराबाद येथे डेल कॅम्प्युटर येथे नोकरीला होता. परंतु मागील १ वर्षापासून काम नसल्याने तो घरीच होता. तपासात समोर आलं की, घरात एका व्यक्तीची एन्ट्री झाली. घराच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेराचे डीवीआरही गायब झाले. घरातील एक कपाट खुले होते. त्यामुळे या घटनेमागे लुटमारीची शक्यता असल्याचं पोलिसांना वाटत होते. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले तेव्हा एक संशयित त्यांना दिसून आला. हा संशयित दशरथपुरी मेट्रो स्टेशनवर एका ई रिक्षातून उतरताना दिसला.
पोलिसांनी पहिल्यांदा ई रिक्षा आणि त्याच्या मालकाचा शोध घेतला. ई रिक्षाच्या मालकाला विचारले असता त्याने सांगितले एक व्यक्ती माझ्या रिक्षात बसला होता. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. परंतु रिक्षावाल्याने त्याला याबाबत विचारले असता त्याने काही उत्तर दिले नाही. त्यानंतर माझ्या रिक्षाचे भाडे ३० रुपये झाले होते. परंतु त्या व्यक्तीकडे फाटलेली नोट होती त्यामुळे ती घेण्यास मी नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने पेटीएममधून रिक्षावाल्याच्या मोबाईलवर ३० रुपये ट्रान्सफर केले. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नाव घेतले.
हा आरोपी अभिषेक वर्मा होता. बबिताच्या भावाचा मुलगा अभिषेकला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मी माझ्या आत्याकडून लग्नासाठी ५० हजार रुपये उधार घेतले होते. आत्या वारंवार त्या पैशांबाबत माझ्याकडे विचारणा करत मला वाटेल तसे बोलत होती. त्यामुळे आत्या आणि तिच्या मुलाची हत्या करण्याचं षडयंत्र रचलं. घटनेच्या २ दिवसआधी अभिषेक बबिताच्या घरी आला होता. तेव्हा आर्थिक व्यवहारांवरून बबिता आणि अभिषेक यांच्यात भांडण झालं.
त्यानंतर मंगळवारी हत्या करण्याच्या हेतून अभिषेक स्कूटी घेऊन आला. त्याने स्कूटी दशरथपुरी मेट्रो स्टेशनजवळ पार्क केली. त्यानंतर ई रिक्षातून बबिताच्या घरी गेला. त्याठिकाणी बबिता आणि त्याच्या मुलाची हत्या केली. ही लुटमारीतून हत्या झाली असा बनाव करण्यासाठी त्याने घरातील कपाट उघडं केले होते. त्यानंतर बाहेरील सीसीटीव्हीची डिवीआर काढून घेतला. ई रिक्षातून पुन्हा दशरथपुरी मेट्रो स्टेशनला पोहचलो असं तपासात आरोपीने पोलिसांना सांगितले.