Delhi Acid Attack: अॅसिड हल्ला: मुलीचा चेहरा पूर्ण जळाला असता; दुकानदारानं ट्रीक वापरली, म्हणून वाचली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:31 PM2022-12-16T13:31:57+5:302022-12-16T13:33:34+5:30
दिल्लीतील द्वारका येथील अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
नवी दिल्ली-
दिल्लीतील द्वारका येथील अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. नराधमांनी मुलीला आयुष्यभर वेदना देण्याचा प्रयत्न केला, परंतु घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एखा देवदूतामुळे मुलीच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना मोठी इजा झाली नाही. मुलीच्या तोंडावर आणि मानेवर तातडीनं पाणी टाकलं नसतं तर पीडित मुलीची प्रकृती खूप बिघडू शकली असती. घटनास्थळी काही अंतरावरच असलेल्या दुकानदाराच्या सतर्कतेमुळे मुलगी फक्त ८ टक्के भाजली. दुकानदारानं सांगितलं की त्यानं पीडितेला व्हिवळताना पाहिलं आणि लगेच धाव घेत तिच्या चेहऱ्यावर बादलीभर पाणी ओतलं होतं.
दुकानदार ठरला देवदूत
घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानदाराने सांगितलं की, ती मुलगी धावतच त्याच्याजवळ आली होती. ती किंचाळत होती, जसा की एकादा माणूस आगीत पेट घेतो अशा वेदना तिला होत होत्या. ती खूप घाबरली होती. मला दिसलं की कुणीतरी तिच्यावर अॅसिड फेकून पळालं आहे. पटकन बादली भर पाणी आणलं आणि तिच्या चेहऱ्यावर ओतलं. तेव्हा ती थोडी शांत झाली होती. पण खूपच अॅसिड फेकलं गेलं होतं.
मुलीच्या डोळ्यावर अॅसिडचा परिणाम
सफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे पण तिच्या डोळ्यावर अॅसिडचा परिणाम झाला आहे. रुग्णालयातील डोळ्याचे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. दिलासादायक बाब अशी की पीडिता केवळ ८ टक्के भाजली आहे. हे प्रमाण अधिक असतं तर मोठी अडचण ठरली असती. कारण अॅसिड हल्ल्यातील जखमी लागीपेक्षाही अधिक तीव्र आणि धोकादायक मानली जाते.
पीडिता जबाब देण्याच्या अवस्थेत नाही
द्वारकाचे सब डीविजनचे एसडीएस विनय कुमार मोंगिया यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी पीडितेची तिच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत भेट घेतली. यावेळी पीडिताचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण पीडिता सध्या आयसीयूमध्ये आहे आणि ती जबाब देण्याच्या परिस्थितीत सध्या नाही. तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी काही काही दिवस लागतील असंही ते म्हणाले. त्यानंतरच तिचा जबाब नोंदवता येईल.
पीडितेच्या चेहऱ्यावर काळे डाग
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचा चेहरा एका बाजूनं काळा पडला आहे. एका दुकानदारानं पीडितेच्या चेहऱ्यावर तातडीनं पाणी टाकलं होतं म्हणून तिचा चेहरा पूर्णपणे जळाला नाही. सध्या पीडितेच्या गळ्याकडील भाग सर्वाधिक जळाल्याचं सांगण्यात येत आहे. तर हल्ल्यामुळे आलेली सूज अजूनही कायम आहे. तोंड आणि ओठाला सूज असल्यानं तिला बोलताना अडचण येत आहे. त्यामुळे ती फक्त हो आणि नाही इतकीच प्रतिक्रिया देत आहे.