"राखी बांधायला मला भाऊ पाहिजे"; लेकीसाठी वडिलांनी रस्त्यावर झोपलेलं बाळ चोरलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 12:32 PM2023-08-26T12:32:33+5:302023-08-26T12:38:27+5:30
मुलाच्या मृत्यूनंतर जवळपास एक वर्षानंतर, मुलीने वडिलांकडे एक अजब मागणी केली, जी पूर्ण करण्यासाठी वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.
दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टागोर गार्डनच्या रघुबीर नगरमध्ये राहणारे संजय गुप्ता (41) आणि अनिता गुप्ता (36) यांचं आयुष्य सुखात चाललं होतं. कुटुंबात पती-पत्नीशिवाय एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र एक दिवशी मुलाचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर जवळपास एक वर्षानंतर, मुलीने वडिलांकडे एक अजब मागणी केली, जी पूर्ण करण्यासाठी वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं. राखी बांधण्यासाठी मला भाऊ हवा आहे, असं मुलीने वडिलांना सांगितलं. आपल्या मुलीचं हे बोलणं ऐकून त्यांनी बाईक घेतली आणि मध्यरात्री रस्त्यावर फिरू लागले.
अनेक रस्त्यांवर फिरल्यानंतर मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी गुन्हा केला, फुटपाथवरून एक महिन्याचं बाळ चोरलं. मुलाला घरी आणल्यानंतर त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. चट्टा रेल चौक परिसरात फूटपाथवर राहणाऱ्या एका अपंग महिलेचं मूल तिच्यासोबत झोपलं होतं. मूल चोरीला गेल्यानंतर महिलेने डोळे उघडले असता मूल तिथे नसल्याचं दिसलं. गुरुवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महिलेने याची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने सर्वत्र शोध सुरू केला. पोलिसांनी 400 सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले, ज्याद्वारे असे आढळून आले की दोन लोक बाईकवरून परिसरात फिरत होते, ज्यांच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलीस थेट आरोपीच्या घरी गेले, जिथे मुलगा आरामात झोपला होता. पोलिसांनी आरोपी संजयविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.