पादचाऱ्याला कारची जोरदार धडक, बोनेटवरून फरफटतं नेलं; अंगावर काटा आणणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:44 AM2022-02-12T11:44:20+5:302022-02-12T11:54:54+5:30
Delhi hit and run case : रस्त्यावरून चालत असलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरातून 'हिट अँड रन'चे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका 27 वर्षीय तरुणाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पादचाऱ्याला त्याच्या कारने धडक दिली आणि त्याला बोनेटवरून दूरपर्यंत फरफटत नेलं. यानंतर मात्र त्या व्यक्तीला रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये रस्त्यावरून चालत असलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भयंकर घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक रस्त्याच्या कडेला चालत आहेत आणि याच दरम्यान एक भरधाव कार तिथून जात असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती गाडीच्या बोनेटवर फरफटत जातो आणि अचानक खाली पडतो. अनियंत्रित झालेल्या भरधाव कारच्या बोनेटवरून पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पाहताच दोन दुचाकीस्वार थांबतात आणि त्याला मदत करण्यासाठी पुढे जात असताना कार चालक मात्र घटनास्थळावरून पळून गेला होता हे व्हिडिओमध्ये दिसून येते आहे. गाडी चालकाची ही वृत्ती पाहून लोकही हैराण झाले आहेत. ग्रेटर कैलास पार्ट-1 येथील बी ब्लॉक परिसरातून 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता ही घटना घडली. आनंद विजय मंडेलिया (37) हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र रॅश ड्रायव्हिंगचा त्यांना फटका बसला आहे.
आरोपी तरुण हा खासगी विद्यापीठातील लॉचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत असून, त्याला अटक करण्यात आली आहे. निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या मुलाला वाचवण्याचा आणि पोलिसांच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी विकत घेतलेली आरोपीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.