ऑनलाइन iPhone खरेदी केला अन् २९ लाखांचा फटका बसला, तुम्हीही अशीच चूक करत नाहीय ना? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 01:16 PM2023-03-05T13:16:11+5:302023-03-05T13:16:31+5:30
दिल्लीतील एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरून आयफोन खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे.
नवी दिल्ली-
दिल्लीतील एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरून आयफोन खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. इंस्टाग्राम विक्रेत्याकडून आयफोन विकत घेतला होता. दिल्लीतील घिटोर्नी येथील रहिवासी विकास कटियार यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर जाहिरात पाहिली होती. ज्यावर मोठ्या सवलतीत आयफोन खरेदी करण्याची ऑफर दिली जात होती.
GizmoChina च्या रिपोर्टनुसार, आयफोन खरेदीसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंटची मागणी करण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यानं इतर काही फोनच्या किमतीच्या ३० टक्के रक्कम अॅडव्हान्स मागितली. यासाठी त्यानं कस्टम होल्डिंग आणि इतर पेमेंटसाठीचं कारण ग्राहकाला दिलं.
बरेच दिवस झाले तरी आयफोन मिळाला नाही आणि याची विचारणा केली असता विक्रेत्याने शिपमेंट कस्टममध्ये रोखून धरल्याचे सांगितले. त्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली. पीडिताने विक्रेत्याच्या सांगण्यावरून तब्बल २८,६९,८५० रुपये ($35,000) वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवले. पण आयफोन तर सोडाच त्यानं भरलेले अतिरिक्त पैसेही काही परत मिळाले नाहीत. आपली मोठी फसवणूक झालेली असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटकडे तक्रार दाखल केली.
या चुका करू नका
- ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. तसेच, कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी, विक्रेत्याची योग्य माहिती मिळवा.
- अधिकृत साइटवरून कोणतेही उत्पादन ऑनलाइन खरेदी करा. सोशल नेटवर्किंग साइट्सवर अज्ञात विक्रेत्यांशी ऑनलाइन व्यवहार करू नका.
- ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी, सुरक्षा वैशिष्ट्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोणतेही उत्पादन ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आगाऊ अतिरिक्त पैसे देऊ नका. जर काही घोळ वाटत असेल तर आगाऊ पैसे देऊ नका.