करोडपती चोर! नेपाळमध्ये हॉटेल, यूपीत गेस्ट हाऊस, लखनौमध्ये घर; दिल्लीत केल्या 200 चोऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:29 AM2023-08-16T11:29:05+5:302023-08-16T11:37:35+5:30
चोरट्याने चोरीच्या जोरावर दिल्ली ते नेपाळपर्यंत संपत्ती केली होती. दिल्लीत एकट्याने 200 चोऱ्या केल्या होत्या.
चोरी करून करोडोंची संपत्ती कमावणाऱ्या एका चोरट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने चोरीच्या जोरावर दिल्ली ते नेपाळपर्यंत संपत्ती केली होती. दिल्लीत एकट्याने 200 चोऱ्या केल्या होत्या. त्याला वेगवेगळ्या नावांनी नऊ वेळा अटक करण्यात आली, मात्र कुटुंबाची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस आणि नेपाळमध्ये स्वतःच्या नावाने हॉटेल उघडले होते.
चोरीच्या घटना घडवून त्याने लखनौ आणि दिल्लीत घरं बांधली. 2001 ते 2023 या कालावधीत 15 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन पोलिसांनी एका करोडपती हॉटेल व्यावसायिकाला घरात चोरीच्या आरोपाखाली पकडले आहे. मनोज चौबे असं आरोपीचं नाव आहे. जवळपास 25 वर्षांपासून तो कुटुंबापासून लपून दोन आयुष्य जगत होता. आरोपीने सुमारे 200 चोरीच्या घटना घडवल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय मनोज चौबे यांचे कुटुंब सिद्धार्थ नगर जिल्ह्यात राहत होतं, परंतु नंतर ते नेपाळमध्ये स्थायिक झाले. 1997 मध्ये मनोज दिल्लीला आला आणि त्याने कीर्ती नगर पोलीस ठाण्यात कॅन्टीन चालवायला सुरुवात केली. त्याने कॅन्टीनमध्ये चोरी केली आणि पकडला गेला, त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने घरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मोठी रक्कम मिळाल्यावर तो गावी परतायचा.
सुरुवातीला आरोपी मनोज भाड्याच्या घरात राहून चोरी करायचा. त्यासाठी तो आधी परिसराची रेकी करायचा, त्यानंतर मॉडेल टाऊन, रोहिणी, अशोक विहार, पितामपुरा आदी भागातील बंद घरे, घरे, फ्लॅट यांना टार्गेट करायचे. चोरलेल्या रकमेतून आरोपी मनोजने नेपाळमध्ये हॉटेल बांधले. यादरम्यान त्याने यूपीच्या पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं. दिल्लीत पार्किंगचे कंत्राट घेतो, असे त्याने सासरच्या मंडळींना सांगितले होतं. त्यामुळे कधी-कधी त्यांना वर्षातून सहा ते आठ महिने दिल्लीत राहावं लागतं असंही म्हणाला.
सिद्धार्थनगरमधील शोहरातगडमध्ये त्यांनी पत्नीच्या नावावर गेस्ट हाऊस बांधले आहे. मनोजने आपली जमीन त्याच शहरातील एका हॉस्पिटलसाठी भाडेतत्त्वावर दिली होती, ज्यासाठी त्याला दरमहा 2 लाख रुपये भाडे मिळायचे. आरोपी मनोजने लखनौमध्ये कुटुंबासाठी बांधलेले घर घेतले. कोट्यवधींची मालमत्ता आणि लाखोंचे भाडे मिळूनही तो चोरी करण्यासाठी दिल्लीत यायचा. चोरीच्या एका घटनेत पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला.
पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये मनोजचा चेहरा दिसला. यानंतर तो एका ठिकाणी स्कूटीवर फिरताना दिसला. पोलिसांनी स्कूटीचा नंबर तपासला असता स्कूटी विनोद थापा याने विकत घेतल्याचे समोर आले. मनोजने सपना या नेपाळी मुलीशी लग्न केलं होतं. तिला दिल्लीत लपवून ठेवण्यात आलं होतं. सपनाचा भाऊ विनोदही येथे राहतो. विनोदने पोलिसांना सांगितले की, स्कूटी मनोज घेऊन फिरतो. यानंतर पोलिसांनी आरोपी मनोजला पकडलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.