भयावह! ३५० रुपयांसाठी युवकाला १०० वेळा चाकूने भोसकले; मृतदेहाजवळ केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:41 AM2023-11-23T11:41:29+5:302023-11-23T13:28:14+5:30
राजधानी दिल्लीतील या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली एका भयानक हत्याकांडाने हादरली आहे. दिल्लीच्या ईशान्य भागात एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने अल्पवयीन मुलाने एका युवकावर चाकूने १०० वेळा वार करून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर या हत्येनंतर अल्पवयीन आरोपी मृतदेहाजवळ नाचला. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२१ नोव्हेंबरला रात्री उशिरा मृत युवक आपल्या घराकडे जात होता. हा भाग झोपडपट्ट्यांचा परिसर आहे आणि अतिशय अरुंद गल्ल्या आहेत. या युवकाला जाताना पाहताच त्याच परिसरातील एका अल्पवयीन मुलाने चोरी करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर आधी मागून हल्ला केला. त्यानंतर युवक बेशुद्ध पडण्याच्या मार्गावर येताच अल्पवयीन आरोपीने त्याच्यावर कटरसारख्या चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. जवळपास १०० हून अधिक वेळा युवकावर वार केले. या घटनेनंतर परिसरातील लोकांना आरोपीने धमकावले आणि मृत युवकाजवळ मोठमोठ्याने ओवरडून नाचू लागला.
दरम्यान, या घनटेनंतर काही तासातच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला त्याच परिसरातून अटक केली आहे. चौकशीत त्याने दारूच्या नशेत हा गुन्हा केल्याचे उघड झाले. तसेच, युवकाची हत्या केल्यानंतर त्याच्या खिशातील ३५० रुपये लुटून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना केवळ लुटण्याच्या उद्देशाने घडली असून, मयत आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते किंवा त्यांच्यात कोणतेही वैर नव्हते.
काय म्हणाले परिसरातील नागरिक?
राजधानी दिल्लीतील या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या घटनेनंतर परिसरातील महिलांनी सांगितले की, मारेकरी वेडा दिसत होता, दारूच्या नशेत होता, मारल्यानंतर तो नाचत होता आणि ओरडत होता. मी खून केला आहे, आता मी जेलमध्ये जाणार आहे, असे म्हणत होता.