शरीराचे सहा तुकडे, राजधानी दिल्लीत 'ISIS-स्टाईल' हत्या; आरोपींचा दहशतवाद्यांशी संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 05:45 PM2023-01-15T17:45:42+5:302023-01-15T17:57:32+5:30
निष्पाप व्यक्तीचा खून करुन सहा तुकडे केले आणि व्हिडिओ परदेशात बसलेल्या आकांना पाठवला.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एका व्यक्तीची ISIS स्टाईलने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत आरोपींनी दिल्लीतील व्यक्तीची हत्या करुन मृतदेहाचे सहा तुकडे केले. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या दोघांनी एका व्यक्तीचा शिरच्छेद केल्याची कबुली दिली होती, तसेच त्यांच्या आकांना हत्येचा व्हिडिओही पाठवला.
उत्तर दिल्लीतील भालस्वा डेअरीमध्ये सहा तुकडे केलेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात पोलिसांना दहशतवादी संबंध आढळून आला. यानंतर एटीएसकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हत्या करू शकतो, असा पुरावा परदेशात बसलेल्या आकांना देण्यासाठी आरोपींनी 'ISIS स्टाईल'ने हत्या केली. आरोपी सोहेल पाकिस्तानातील आयएसआयशी संबंधित आहे, तर आरोपी जगजीत कॅनडात बसलेल्या अर्शदीप सिंग गिल या दहशतवाद्याशी संबंधित आहे.
असा झाला खूनाचा उलगडा
एका गँगस्टर प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नौशादला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान संगनमताने एका व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिली. सोहेलचा साथीदार नौशादने एका अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन व्यक्तीला आमिष दाखवून निर्जण ठिकाणी नेले आणि तिथे त्याचे सहा तुकडे करुन अवयव भालस्वा डेअरी परिसरातील तलावात फेकले होते. पोलिसांनी शरीराचे पाच अवयव जप्त केले असून अजून एक जप्त करणे बाकी आहे.
दहशतवादी संबंध
दिल्लीमध्ये आरोपी सोहेलची भेट 56 वर्षीय नौशादशी झाली. नौशादला 1990च्या दशकाच्या सुरुवातीला खुनाच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातच सोहेलला कट्टरतावादाचे धडे दिले. 2013 मध्ये सोहेलची सुटका झाल्यानंतर नौशाद देखील तुरुंगातून बाहेर येण्यात यशस्वी झाला, परंतु 2020 मध्ये त्याला खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. नौशाद गेल्या वर्षी तुरुंगातून सुटल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेलने 2000 साली लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील आरोपी मोहम्मद आरिफचीही तुरुंगात भेट घेतली होती. सोहेल सध्या पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) शी संबंधित आहे. तपास अधिकार्यांनी असेही सांगितले की, नौशादने 2018 मध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्यांतर्गत कॅनडास्थित अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्श डल्ला याच्याशी संबंध असलेल्या जगजित सिंग याचीही भेट घेतली.