Delhi Murder: दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:06 PM2023-05-29T16:06:05+5:302023-05-29T16:06:47+5:30
Delhi Murder Case: राजधीनी दिल्लीत 16 वर्षीय मुलीची चाकूचे 40 वार आणि दगडाने ठेचून हत्या झाली आहे.
Delhi Girl Murder Update: नवी दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या तरुणाने 16 वर्षीय मुलीची चाकूने 40 वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत एडीसीपी आऊटर-उत्तर राजा बंठिया यांनी सांगितले की, मुलगी जे.जे. जे. कॉलनीची रहिवासी आहे. ती रस्त्यावरुन चालत जात असताना आरोपीने तिला अडवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपी मुलगा आणि मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, त्याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे.
दिल्लीपोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांमध्ये आधीपासून प्रेमसंबंध होते, पण शनिवारी त्यांचे भांडण झाले. रविवारी मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जात असताना वाटेत आरोपीने तिला अडवून तिच्यावर हल्ला केला. व्हायरल व्हिडिओनुसार, आरोपीने तिच्यावर जवळपास 40 वार केले आहेत. पण, शवविच्छेदनानंतरच तिच्यावर किती वार करण्यात आले, हे स्पष्ट होईल. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302(हत्या) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.