शेजाऱ्याला मारण्यासाठी कोर्टात ठेवला बॉम्ब, DRDOच्या शास्त्रज्ञाला पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 03:44 PM2021-12-19T15:44:45+5:302021-12-19T15:49:19+5:30
9 डिसेंबरला दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट झाला होता. हा स्फोट DRDOच्या शास्त्रज्ञाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट (Rohini Court Blast) झाल्याची घटना घडली होती. तो स्फोट कमी तीव्रतेचा असला, तरी एकजण जखमी झाला होता. तसेच, स्फोटामुळे जमिनीत खड्डाही पडला होता. त्या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एका शास्त्रज्ञाने हा स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
9 डिसेंबर रोजी दिल्लीतील रोहिणी जिल्हा न्यायालयातील कोर्ट रूम नंबर 102 मध्ये सकाळच्या सुमारास एक स्फोट झाला होता. त्या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला होता. टिफीन बॉक्समध्ये आयईडी ठेवून हा स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या शास्त्रज्ञाने त्याच्या शेजाऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हा आयईडी स्फोट घडवून आणला होता.
रोहिणी कोर्ट विस्फोट मामले में भारत भूषण कटारिया नामक एक व्यक्ति को गिरफ़्तार किया गया है। उसके घर से वो बैग बरामद किया गया है जिसमें विस्फोटक को कोर्ट ले जाया गया था। विस्फोट से पहले और बाद तक के CCTV फुटेज में भी उसकी मौजूदगी देखी गई है: दिल्ली पुलिस आयुक्त राकेश अस्थाना pic.twitter.com/PefeyKuTqy
— ANI_HindiNews (@AHindinews) December 18, 2021
त्या दिवशी नेमकं काय झालं ?
याप्रकरणी आरोपी भारतभूषण कटारिया (47) याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, डीआरडीओमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ कटारिया याने घटनेच्या दिवशी सकाळी 9.33 वाजता दोन पिशव्या घेऊन कोर्टात प्रवेश केला आणि कोर्ट रुम नंबर 102 मध्ये एक बॅग ठेवली. त्यानंतर सकाळी 10.35 वाजता न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडला. त्यानंतर स्फोट झाता होता, सीसीटीव्ही फुटेजमधून हा खुलासा झाला आहे.
शेजाऱ्याला मारण्यासाठी ठेवले आयईडी
कटारियाने स्फोटके न्यायालयाच्या खोलीत टिफिनमध्ये ठेवली होती. त्याचे वकील असलेल्या आपल्या शेजाऱ्याशी वाद आहेत. त्या दोघांनी एकमेकांविरोधात अनेक गुन्हे दाखल केलेली आहेत. या वैरातूनच शेजाऱ्याला ठार मारण्यासाठी कटारियाने हा कट रचला होता. स्फोटानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले होते.