15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:42 PM2022-08-12T12:42:56+5:302022-08-12T12:44:16+5:30
Delhi Police : 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. याचा वापर कुठे केला जाणार होता. यासंबंधींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी 2000 जिवंत काडतुसे सापडली आहेत. यासोबतच दिल्लीत काडतुसे पुरवणाऱ्या सहा आरोपींनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्ली पोलिसांनी पुरवठादाराला आनंद विहार परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, आरोपी ही 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. याचा वापर कुठे केला जाणार होता. यासंबंधींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
15 ऑगस्ट निमित्त दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयिताची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2000 जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या जप्त केल्या. यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे.
10 हजार पोलीस तैनात करण्यात येणार!
यंदा संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या आनंदी वातावरणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थाही करण्यात येत आहे. यावेळी 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, 15 ऑगस्टपूर्वीच संपूर्ण दिल्लीला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा स्वतः विविध गुप्तचर संस्था आणि सुरक्षा आस्थापनांच्या प्रमुखांसह सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट!
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना दिल्लीत हल्ला करण्याचा कट रचू शकतात. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 10 पानी रिपोर्टमध्ये गुप्तचर यंत्रणेने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, जैश या दहशतवादी कटाची योजना आखत असल्याची माहिती दिली आहे. आयएसआयला त्यांना लॉजिस्टिक मदत देऊन स्फोट घडवायचा आहे, या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये अनेक नेत्यांसह बड्या संस्थांच्या इमारतींना लक्ष्य केले जाऊ शकते.