दिल्ली पाेलीस आले, कारवाई करून गेले; मुंबईजवळ १७२५ काेटींचे हेराॅईन पकडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:49 AM2022-09-22T09:49:40+5:302022-09-22T09:50:28+5:30
जेएनपीएच्या एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये हे ड्रग्ज लिकोरिस लेपाच्या नावाखाली २१ जून २०२१ रोजी तस्करीच्या मार्गाने परदेशातून आणले होते.
लोकमूत न्यूज नेटवर्क
उरण : येथील जेएनपीएच्या बंदरांत तस्करीसाठी आयात केलेल्या एका कंटेनरमधून १,७२५ कोटींचा ३५० किलोचा हेरॉईनचा साठा दिल्लीतील स्पेशल सेलच्या पोलिसांनी बुधवारी जप्त केला. कंटेनरच्या वजनासह त्यात एकूण २२ टन म्हणजेच ३५० किलो हेरॉईन होते, असे एका बंदर अधिकाऱ्याने सांगितले. हा साठा दुबईतून आल्याचे सांगण्यात येते.
जेएनपीएच्या एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये हे ड्रग्ज लिकोरिस लेपाच्या नावाखाली २१ जून २०२१ रोजी तस्करीच्या मार्गाने परदेशातून आणले होते. मात्र, हा कंटेनर नेण्यासाठी कोणतीही एजन्सी पुढे आली नसल्याने हा साठा वर्षभरापासून पडून होता. या कंटेनरवर कोणीही दावा केला नसल्याने संशय वाढला आणि शिताफीने लपवून ठेवलेला ३५० किलो हेरॉईनचा साठा सापडला.
वर्षभर कंटेनरमध्ये पडून हाेता माल; चेन्नईतील आरोपींनी दिली माहिती
चेन्नई बंदरात काही दिवसांपूर्वी ३१२ किलो हेरॉईनचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात मुस्तफा व रहिमउल्ला या दोन अफगाणी आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत जेएनपीए बंदरातील एका खासगी कंटेनर टर्मिनलमध्ये ३५० किलो हेरॉईनचा साठा दडवून ठेवला असल्याची माहिती उघड झाली होती. त्या माहितीच्या आधारे दिल्लीतील स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांच्या १६ सप्टेंबरला या कंटेनर टर्मिनलमधील संशयित कंटेनरचा शोध सुरू केला आणि तपासणी केली. तेव्हा ४० फुटी कंटेनरमध्ये लिकोरिस लेपाच्या नावाखाली माल लपवल्याचे उघड झाले.
गुजरातनंतरची मोठी कारवाई
या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १,७२५ कोटींच्या घरात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधीही गुजरातमधील मुद्रा बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सप्टेंबर २०२१ मध्ये २१ हजार कोटींचे तीन हजार किलो हेरॉईन पकडले होते.
जूनमध्ये पकडले ३६२ कोटींचे ड्रग्ज
नवी मुंबई पोलिसांनीही जून महिन्यात पंजाब पोलिसांच्या मदतीने ३६२ कोटींचा हेरॉईनचा साठा येथील खासगी कंटेनर यार्डमधून हस्तगत केला होता. याचा तपास एटीएसकडे सोपविला आहे. तपास यंत्रणांकडून या बंदरात दुसऱ्यांदा अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बंदरांच्या खासगीकरणामुळे तस्करी वाढल्याचा आरोप
कारवाईदरम्यान दिल्लीतील स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस, सुरक्षा यंत्रणांना कोणतीही प्रकारची माहिती न देता कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली. त्यामुळे जेव्हा ड्रग जप्त केल्याचे समजले, तोवर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणा अंधारात होत्या. सध्या बहुतांश बंदराचे खासगीकरण झाले आहे. त्यामुळेच बंदरांतील तस्करीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचा आरोप कामगार संघटना करीत आहेत.