video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 03:23 PM2024-09-29T15:23:36+5:302024-09-29T15:24:08+5:30

चोरीच्या घटनेच्या तपासासाठी जात असताना घडला धक्कादायक प्रकार.

delhi police constable hit and run, died during treatment in hospital | video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू

video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीच्या नांगलोई भागात हिट-अँड-रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, त्यात साध्या वेशात कॉन्स्टेबल आपल्या दुचाकीवरुन जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याचे दिसत आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली असून, संदीप असे या मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे.

चोरीच्या तपासासाठी जात असताना घटना
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्याचा शोध घेण्यासाठी कॉन्स्टेबल संदीप साध्या ड्रेसमध्ये कर्तव्य बजावत होते. ते दुचाकीवर जात असताना त्यांना एक संशयास्पद वॅगनआर कार दिसली. त्यांनी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्याचा इशारा केला, मात्र त्याने गाडी थांबवली नाही. यानंतर संदीप यांनी आपल्या दुचाकीवर कारचा पाठलाग करुन ओव्हरटेक केले.

यावेळी वॅगनआरच्या चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि पाठीमागून संदीपच्या दुचाकीला धडक देऊन सुमारे 10 मीटरपर्यंत फरफटत नेले. यावेळी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही वॅगनआरची धडक बसली. दोन गाड्यांच्या मध्ये अडकल्याने संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ प्रथमोपचारासाटी सोनिया रुग्णालयात आणि तेथून पुढील उपचारासाठी पश्चिम विहार येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मीडियाला संबोधित करताना डीसीपी जिमी चिराम म्हणाले की, वॅगनआरमध्ये दोघे प्रवास करत होते. घटनेनंतर त्यांनी पळ काढला. या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. दोघांची ओळख पटली असून, घटनेतील वॅगनआर कारही जप्त करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हा रोड रेजचा प्रकार असल्याचे दिसत असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसात तैनात असलेले संदीप हरियाणातील रोहतकचे रहिवासी होते. त्यांची 2018 साली दिल्ली पोलिसांत भरती झाली. 30 वर्षीय संदीप यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे. संदीपच्या मृत्यूमुळे पत्नी व आईची अवस्था वाईट असून रडत आहे.

 

Web Title: delhi police constable hit and run, died during treatment in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.