Prince Raj Paswan Rape Case: खासदार प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; चिराग पासवान यांचेही नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:57 AM2021-09-14T10:57:00+5:302021-09-14T10:58:38+5:30
Prince Raj Paswan Rape Case: पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
बिहारच्या समस्तीपूरमधून लोकसभेवर निवडून गेलेले लोक जनशक्ति पार्टी (LJP) चे खासदार प्रिन्स राज पासवान (Prince Raj Paswan) यांच्याविरोधात दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये चिराग पासवान (Chirag paswan) यांचेही नाव आल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Chirag Paswan's Cousin Prince Raj Booked for Rape in Delhi.)
जवळपास तीन महिन्यांपूर्वी एका पीडित तरुणीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता न्यायालयाचा आदेश आल्याने खासदार प्रिन्स राज पासवान (Prince Raj Paswan) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर 9 सप्टेंबरला नोंदविण्यात आला आहे.
पीडितेने प्रिन्स राज यांच्यावर तिचा अश्लिल व्हिडीओही बनविल्याचा आरोप केला आहे. बलात्कारानंतर वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी देण्यात आली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांत न जाण्यासाठी धमकविण्यात आले होते, दबाव टाकण्यात आला होता. प्रिन्स हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस पासवान यांचे पुतणे आहेत.
FIR मध्ये चिरागचे देखील नाव
एफआयआरमध्ये चिराग पासवान यांचे नाव आले आहे. तिने चिराग पासवान यांना या घटनेबाबत सांगितले होते. तेव्हा चिराग पासवान यांनी काहीही एकून घेतले नाही. जेव्हा पोलिसांत जाण्याचे सांगितले तेव्हा चिरागने मला भेट दिली आणि कोणताही गुन्हा दाखल करू नको असे सांगितले. चिराग पासवानने पक्षाचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.
तरुणी लोजपाची कार्यकर्ता
ही पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. प्रिन्सने देखील तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये तिने चुकीचे आरोप केल्याचे म्हटले आहे. चिराग आणि पशुपती यांच्यात जेव्हा पक्षावरून ओढाताण सुरु होती तेव्हा चिराग यांनी पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता.