केस कापण्यातील चूक, दोन कोटींचा दंड; पंचतारांकित हॉटेलला आयोगाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:42 AM2023-05-02T05:42:05+5:302023-05-02T05:42:31+5:30

सूचनेविरुद्ध केस कापणे ही सेवेत कमतरता असल्याचा आरोप करत तिने राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून पाच कोटी २० लाखांची भरपाई मागितली

Delhi salon fined Rs 2 crore, for cutting model's hair wrongly | केस कापण्यातील चूक, दोन कोटींचा दंड; पंचतारांकित हॉटेलला आयोगाचा दणका

केस कापण्यातील चूक, दोन कोटींचा दंड; पंचतारांकित हॉटेलला आयोगाचा दणका

googlenewsNext

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : चुकीचे केस कापल्याबद्दल दिल्लीच्या पंचतारांकित आयटीसी मौर्य हॉटेलने महिलेला दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई सव्याज द्यावी, असे आदेश राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिले आहेत.

आशना रॉय केसांची जाहिरात करत असे. केसांचे रंग व वाढ करणाऱ्या वस्तूंच्या जाहिरातीसाठी त्यांना मोठा मोबदला मिळत असे. २०१८ मध्ये आशना रॉय आयटीसी मौर्यमध्ये हेअर ड्रेसिंगसाठी गेल्या होत्या. त्यांनी विशिष्ट स्टाइलमध्ये केस कापण्याची सूचना केली. परंतु स्टायलिस्टने तिच्या सूचनेप्रमाणे केस न कापता तिचे केस लहान केले. केस कापल्यामुळे तिच्या मॉडेलिंग व्यवसायाचा नाश होणार या भीतीने तिच्या मनावर प्रचंड आघात झाला.

सूचनेविरुद्ध केस कापणे ही सेवेत कमतरता असल्याचा आरोप करत तिने राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून पाच कोटी २० लाखांची भरपाई मागितली. याला पुष्टी देण्यासाठी तिने व्हीएलसीसी आणि पँटिनच्या जाहिराती व माहिती पत्रकाच्या प्रती दाखल केल्या.

मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदाची संधी गेली
तिचा असाही युक्तिवाद होता की, दिल्लीतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदासाठी तिची मुलाखत होती. यावेळी नीटनेटके दिसावे म्हणून ती सलूनमध्ये गेली होती. निवड झाल्यास तिला पगार आणि इतर सुविधांची रक्कम मिळून वार्षिक एक कोटी मिळाले असते. केस कापल्यामुळे तिची ही संधीदेखील गेली. हे सिद्ध करण्यासाठी तिने कंपनीसोबत झालेला पत्रव्यवहार व ईमेलच्या प्रती सादर केल्या.
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि डॉ. एस. एम. कांतीकर यांच्या खंडपीठाने तिचा युक्तिवाद स्वीकारला. आयटीसी लिमिटेडने आशनाला तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह दोन कोटी रुपये द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले.

सुप्रीम कोर्टातही आयोगाचा निर्णय कायम
राष्ट्रीय ग्राहक आयोगाने २०२१ मध्ये २ कोटी नुकसान भरपाई मंजूर केली होती. याविरुध्द आयटीसी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने ही सेवेतील त्रुटी असल्याचे मान्य केले; पण नुकसान भरपाईच्या रकमेवर फेरविचार करण्यासाठी प्रकरण राष्ट्रीय आयोगाकडे परत केले. या वर निर्णय देताना रक्कम २ कोटीच ठेवली व यावर ९ %व्याज वाढवले.

Web Title: Delhi salon fined Rs 2 crore, for cutting model's hair wrongly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.