धक्कादायक! MBBS डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची ऑपरेशन; रुग्णांकडून घ्यायची कमी पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:17 AM2023-11-17T11:17:53+5:302023-11-17T11:18:24+5:30
क्लिनिकमध्ये कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळलं जात होतं.
दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास येथून दोन डॉक्टर आणि दोन बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळलं जात होतं. या क्लिनिकमध्ये सर्जरीनंतर 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा हा धक्कादायक खुलासा झाला. आता या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसं या चार आरोपींसोबत फरिदाबादमधील आणखी एका डॉक्टरचाही या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
रुग्णालयात डॉक्टर लोकांवर शस्त्रक्रियाही करत होता, अशी माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जाऊ शकते. दक्षिण दिल्लीच्या पॉश भागातील ग्रेटर कैलाशमध्ये असलेल्या अग्रवाल मेडिकल सेंटरमध्ये ही घटना घडली. येथे ऑक्टोबर महिन्यात 45 वर्षीय व्यक्तीचा सर्जरीनंतर मृत्यू झाला. याप्रकरणी चार डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.
डॉ. नीरज अग्रवाल, त्याची पत्नी पूजा अग्रवाल, डॉ. जसप्रीत आणि ओटी टेक्निशियन महेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वृत्तसंस्थेनुसार, नीरज आणि जसप्रीत हे स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत. मात्र पूजा आणि महेंद्र हे डॉक्टर असल्याचं दाखवून लोकांवर सर्जरी करत होते. डॉक्टर नीरज वैद्यकीय पदवीही नसलेल्या पत्नी पूजाकडून ऑपरेशनमध्ये मदत घेत असत. त्याच वेळी, महेंद्र नर्सिंग होममध्ये काही रुग्णाचं ऑपरेशन करायचा.
या लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका 45 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची तक्रार पोलिसांना मिळाल्यावर त्यांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं. कारण 2022 मध्येही येथे एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. प्रसूती वेदनांमुळे तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रसूती न करताच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हे अग्रवाल मेडिकल सेंटर डॉ. नीरज अग्रवाल याचे आहे. नीरजने यापूर्वी सफदरजंग रुग्णालयात काम केलं आहे. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी हे मेडिकल सेंटर उघडलं. ज्यामध्ये त्याची पत्नी पूजा अग्रवाल रिसेप्शनिस्ट आणि नर्सिंग स्टाफ म्हणून काम करत होती. या हॉस्पिटलमध्ये महेंद्रने ऑपरेशन टेक्निशियन म्हणून काम केलं. या तिघांनी या रुग्णालयात सर्जन असलेल्या डॉ. जसप्रीत यांचं लेटरहेड ठेवलं होतं.
कोणताही रुग्ण आला तर त्याला ऑपरेशन करण्यास सांगितलं जायचं. डॉक्टर जसप्रीत यांच्या नावाने प्रिस्क्रिप्शन तयार करण्यात केलं जायचं. तर महेंद्र त्यांचं ऑपरेशन करायचा. या लोकांच्या निष्काळजीपणामुळे ऑपरेशननंतर अनेकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं. त्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.