मामासोबत बाईकवरून जात होता एमेझॉन कंपनीचा मॅनेजर; हल्लेखोरांनी डोक्यात झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 01:18 PM2023-08-30T13:18:50+5:302023-08-30T13:35:49+5:30
हरप्रीतने बाईक थांबवताच हल्लेखोरांनी मामा-भाचाच्या डोक्यात गोळी झाडली.
दिल्लीत अज्ञात हल्लेखोरांनी बाईकवरून जाणाऱ्या मामा आणि भाचाच्या डोक्यात गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तेथून पळ काढला. या घटनेत भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तर मामा गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे प्रकरण भजनपुरा भागातील सुभाष विहारशी संबंधित आहे. येथे राहणारा हरप्रीत सिंह (36) मंगळवारी त्याचा मामा गोविंद यांच्यासोबत बाईकवरून कुठेतरी जात होता. त्यामुळे पाच जणांनी त्यांना वाटेत अडवलं. हरप्रीतने बाईक थांबवताच हल्लेखोरांनी मामा-भाचाच्या डोक्यात गोळी झाडली. यात हरप्रीतचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये गोविंद गंभीर जखमी झाले आहेत.
गुन्हा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गोविंद य़ांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिलशाद गार्डन येथील गुरु तेग बहादूर रुग्णालयात पाठवलं. सध्या गोविंद यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी ही घटना घडवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची माहिती गोळा करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत हरप्रीत हा ई-कॉमर्स कंपनी एमेझॉनमध्ये मॅनेजर होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.