दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने केला मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:24 AM2019-08-31T06:24:41+5:302019-08-31T06:25:24+5:30

गुन्हे शाखेकडून अटक; पाकिस्तानात फोन करण्यासोबतच आयएसआयची माहिती शोधण्याचा केला होता प्रयत्न

Delhi University student calls for terrorist attack in Mumbai | दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने केला मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कॉल

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने केला मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कॉल

Next

मुंबई : मुंबईत हायअलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’ अशा धमकीच्या कॉलने खळबळ उडाली. मुंबईतही बंदोबस्त वाढला. मात्र, तपासात कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली.


धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने तरुणाची चौकशी सुरू आहे.
शुभमकुमार पाल (२२) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या हेतूबाबत तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याने, एनआयएच्या मुख्यालयात कॉल करून ‘बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है, रोक सको तो रोक लो’ असे बोलून फोन कट केला. त्याच्या या कॉलमुळे मुंबईत बंदोबस्त वाढविण्यात आला. दहशतवाद विरोधी पथकासह गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. तपासाअंती हे पथक शुभमपर्यंत पोहोचले. त्याला तांत्रिक तपासातून गोरेगावच्या नेस्को, आयटी पार्क येथून अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलद्वारे त्याने एनआयए कार्यालयात कॉल केल्याचे स्पष्ट झाले.


चार वेळा पाकिस्तानमध्ये कॉल
च्एनआयएआधी शुभमने चार वेळा पाकिस्तानच्या विविध दूरध्वनी आणि मोबाइल क्रमांकावर कॉल केल्याचे आढळून आले, तसेच पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी शोधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही त्याच्या मोबाइलमधून समोर आली.
च्याबाबत गुन्हे शाखा शुभमची कसून चौकशी करत आहे. मात्र, तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ये-जा
शुभमच्या वडिलांचा गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेली उपकरणे विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त तो जम्मू-काश्मीर, लेह-लडाख या भागात जाऊन आल्याचे चौकशीत समोर आले.
दारूच्या नशेत कॉल केल्याचाही अंदाज
दिल्लीच्या मेहरोली भागातील गढवाल संकुलात शुभम राहण्यास आहे. घरात सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. त्यानंतर तो येथेच वास्तव्याला होता. दारूच्या नशेत त्याने हा प्रताप केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Delhi University student calls for terrorist attack in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.