धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:54 PM2020-03-02T16:54:38+5:302020-03-02T17:29:03+5:30
आपचा नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरातील छाप्यामध्ये मोठमोठे खुलासे समोर येत आहेत.
नवी दिल्ली : आपचा नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरातील छाप्यामध्ये मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला ताहिरला निर्दोष असल्याचा दावा करणाऱ्या आपने त्याला पक्षातून निलंबित केले आहे. मात्र, दिल्ली हिंसाचारामध्ये त्याच्या घरातून अॅसिडही फेकण्यात आल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.
ताहिरच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते. हे अॅसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही.
ताहिरकडे सापडलेले अॅसिड हे तीन पैकी सर्वात घातकी प्रकारातील आहे. पहिल्या प्रकारातील अॅसिड हे टॉयलेट साफ करण्यासाठी, दुसरे जंग लागेलेली भांडी आणि तिसरे कंपन्यांमध्ये मशिन साफ करण्यासाठी वापरले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील अॅसिड हे कोणत्याही प्रयोगासाठी आणले जात नाही. तसेच ताहिरच्या घरीही अशा प्रकारचे कोणतेही काम केले जात नव्हते. लोकांवर फेकण्यासाठी हे अॅसिड पिशव्यामध्ये भरण्यात आले होते. या पिशव्या भरलेल्या गोण्याही ताहिरच्या घरात सापडल्या आहेत. एका पिशवीमध्ये पाच ते सात लोक भाजू शकतात, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
मदत कार्य सुरू
ईशान्य जिल्ह्यातील हिंसाचारात पीडित नागरिकांना तातडीने मदत म्हणून दिल्ली सरकारने 25-25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. हिंसाचाराने बाधित झालेल्या सर्व उपविभागातील अधिकाऱ्यांनी पीडितांना त्वरित दिलासा दिला. ही रक्कम पीडितांच्या घरी जाऊन देण्यात आली. तसेच काही लोक एसडीएम कार्यालयात आले आणि त्यांनी ही रक्कम घेतली. परिस्थिती सुधारत असली तरीही सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत.