Delhi Violence : आयबी अधिकाऱ्याची हत्या ताहिर हुसैनच्या भावाकडून? पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:42 PM2020-03-09T13:42:23+5:302020-03-09T13:45:56+5:30
Delhi Violence : ताहिर हुसैनला मदत करणारे वडील-मुलगा रियासत अली आणि लियाकत यांना कड़कड़डूमा कोर्टात हजर करण्यात आले होते.
नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचाराच्या वेळी गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकित शर्माच्या निर्घृण हत्येचा आरोप ठेवत आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनवर पोलिसांनी कारवाई केली. पोलीस सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस सध्या ताहिर हुसैनचा भाऊ शाह आलम याचा शोध घेत आहेत. कारण अंकित शर्मा हत्येच्या आरोपाची संशयाची सुई आता आलमकडे वळलेली आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीत शाह आलमचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याआधी रविवारी, ताहिर हुसैनला मदत करणारे वडील-मुलगा रियासत अली आणि लियाकत यांना कड़कड़डूमा कोर्टात हजर करण्यात आले होते.
दिल्ली हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केलेल्या रियासत अलीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून त्याचे वडील लियाकत यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या तारिक रिझवी याला जामीन मिळाला. अटक पिता - पत्राने हिंसाचाराच्या वेळी जमावाचे नेतृत्व केल्याचे, त्या ठिकाणी दगडफेक व पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे.
महत्त्वपूर्ण म्हणजे पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी चांद बाग परिसरातील नाल्यातून अंकित शर्माचा मृतदेह ताब्यात घेतला होता. ताहिर हुसैनने मुलाचा खून केल्याचा आरोप अंकितचे वडील रवींद्र कुमार यांनी केला होता. बरेच दिवस शोध घेऊनही ताहिर पोलिसांसमोर आला नव्हता. पोलिसांनी त्याला नोटीड धाडल्यानंतर त्याने कोर्टात शरणागती पत्करली होती. हिंसाचारानंतर तो मुस्तफाबादच्या नेहरू विहार परिसरात गेला असल्याचे ताहिर हुसैन यांनी पोलिसांना सांगितले होते. यानंतर दोन दिवस तो झाकीर नगर परिसरातील तारिकच्या घरात लपला होता.
शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक
Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण
६ मार्च रोजी कड़कड़डूमा न्यायालयाने ताहिरला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ५३ लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.