Delhi Voilence : दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दंगेखोरांची पोलिसांनी केली धरपकड सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 08:59 PM2020-02-27T20:59:15+5:302020-02-27T21:02:41+5:30
Delhi Voilence : आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आता बरीच पोलीस पथकं दिल्ली परिसरात छापेमारी करत आहेत.
नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी अचानक अनेक विशेष पथके तयार करून कारवाई करण्यास सुरवात केली. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आता बरीच पोलीस पथकं दिल्ली परिसरात छापेमारी करत आहेत.
दंगलखोरांना पकडण्यासाठी सिव्हिल पोलीस, स्पेशल सेल आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि जवानांना वेगवेगळ्या पथकात सामील केले गेले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, “हिंसाचारात सामील असलेल्या सर्व पाहिजेत व्यक्तींच्या शोधात पथके वेगवेगळ्या संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत, तर सर्वप्रथम आम्ही नगरसेवकाचा शोध घेत आहोत जो प्रकाशझोतात आल्यानंतर गायब झाला आहे.
उत्तर-पूर्व दिल्लीत तैनात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणाले की, "गुरू तेग बहादूर रुग्णालयात आमचे बरेच पोलीस कर्मचारी व्यस्त आहेत, तेथे अनेक जखमी दाखल आहेत. जखमींपैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही जखमींना शहरातील जय प्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मृत्यूनंतर आतापर्यंत जवळजवळ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या ३० हुन अधिक आहे."
विशेष आयुक्त आणि डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसाच्या वेळेस परिसराची स्थिती बरीच सुधारली आहे. तेथे तणावपूर्ण शांतता आहे. कोणतीही अनुचित घटना देखील घडलेली नाही. त्यामुळे गुरुवारी अनेक दंगेखोरांचा पोलिसांची पथकं शोध घेत आहेत. हिंसाचारासाठी जबाबदार आणि फरार असलेल्यांच्या शोधात पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत."
#DelhiViolence: A Special Investigation Team (SIT) has been constituted under Delhi Police Crime Branch and all the FIRs have been transferred to the SIT. pic.twitter.com/MBsV4DFGGD
— ANI (@ANI) February 27, 2020
सहआयुक्त आलोक कुमार म्हणाले की, "आम्ही मंगळवारी झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या आयबी सुरक्षा सहाय्यक अंकित शर्माच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहोत. आतापर्यंत अडीचशेहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यातील बरेच निष्पाप आढळले आणि त्यांना घरी पाठवले. १०० हून अधिक लोक अद्याप कोठडीत आहेत. त्यांनी दंगेखोरांविषयी बरीच माहिती दिली आहे. "
मंगळवारी हिंसाचारग्रस्त भजनपुरा आणि झाफराबाद येथे तैनात असलेल्या डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "आयबी स्टाफ अंकित शर्मा हत्येप्रकरणी संशयित नगरसेवकच्या शोधात पोलीस पथके तैनात आहेत." अंकित शर्माचे वडील रवींद्रकुमार शर्मा यांनीही फरार नगरसेवकाचे नाव आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी घेतले आहे.
पीडितांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात शांतता राखण्यात व्यस्त असले तरी वास्तविकता अशी आहे की उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी आधीच आपले कर्तव्य बजावले असते तर गुरुवारी दुपारपर्यंत हिंसाचारात ३४ लोक मारले गेले नसते. दिल्लीचे वातावरण शांत आणि आनंदी असले असते.