घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 02:32 PM2024-10-01T14:32:37+5:302024-10-01T14:33:07+5:30

भरत आपल्या घरातून जेवून बाईकवरून निघाला होता. मात्र २.३० नंतर त्याचा फोन बंद झाला. अडीचच्याच सुमारास भरत शेवटचा सीसीटीव्हीमध्ये दिसला होता.

delivery boy bharat murder inside story indira canal police online mobile order cash payment | घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये भरत कुमार नावाच्या डिलिव्हरी बॉयची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. भरत हा एका ग्राहकाकडे ऑनलाइन ऑर्डर केलेला मोबाईल फोन देण्यासाठी गेला होता. मात्र तेथे ग्राहकाने त्याच्या साथीदारांसह त्याची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून इंदिरा कालव्यात फेकून दिला. मोबाईलचे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून ही हत्या करण्यात आली. कारण कॅश ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून मोबाईलची ऑर्डर देण्यात आली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोन आरोपींना अटक केली. मात्र, मुख्य आरोपी गजानन अद्याप फरार आहे. भरत कुमारच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय भरतचं शेवटचं गजानन नावाच्या व्यक्तीशी बोलणं झालं. ऑर्डर घेण्यासाठी गजानननेच त्याला चिनहटच्या डोडा कॉलनीत बोलावलं होतं. तेथे त्याने साथीदारासह भरतचा गळा आवळून खून करून मोबाईल व पैसे चोरले व मृतदेह कालव्यात फेकून दिला.

२४ सप्टेंबर रोजी डिलिव्हरीसाठी भरत ११ वाजता गजाननशी बोलला होता. यावेळी गजाननने त्याला १२ वाजता फोन करून येण्यास सांगितलं होतं. हत्येपूर्वी भरत आपल्या घरातून जेवण आटोपून बाईकवरून निघाला होता. मात्र २.३० नंतर त्याचा फोन बंद झाला. अडीचच्याच सुमारास भरत शेवटचा सीसीटीव्हीमध्ये दिसला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत डिलिव्हरीसाठी घरून निघाला होता, पण तो घरी परतलाच नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी २५ सप्टेंबर रोजी चिनहट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी भरतच्या मोबाईलचं लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले असता, त्यात शेवटचा कॉल गजाननचा होता. या सुगावाच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले.

गजाननने त्याचा मित्र हिमांशू आणि आकाश यांच्या फोनवरून Google Pixel आणि Vivo मोबाईल ऑर्डर केले होते, ज्याची किंमत सुमारे एक लाख होती. डिलिव्हरीसाठी, हिमांशू आणि आकाशच्या फोनवरून गजानन भरतशी कॉन्फरन्स कॉलवर बोलला होता. काही वेळाने ऑर्डर घेण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी फोन केला. भरत तेथे पोहोचताच गजानन त्याच्या मित्रासह आला आणि खून करून मृतदेह तेथून १२-१५ किमी अंतरावर असलेल्या इंदिरा कालव्यात फेकून दिला.

कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. हिमांशू आणि आकाशला पकडले आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. भरतच्या भावाने सांगितलं की, मुख्य आरोपी गजानन हा भरतसोबत एकाच कंपनीत दोन महिन्यांपासून कामाला होता. दोघांमध्ये ना मैत्री होती ना वाद. त्या कंपनीत गजाननने सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्याच्याकडे बरेच सामान सापडले. यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. 

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्या ठिकाणापासून चिनहट पोलीस ठाणे सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर ज्या कालव्यात मृतदेह फेकण्यात आला तो कालवा घटना स्थळापासून १२ ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या एक टीम इंदिरा कालव्यात मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम राबवत आहे.
 

Web Title: delivery boy bharat murder inside story indira canal police online mobile order cash payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.