मनासारखी ड्युटी लावण्यासाठी शारीरिक संबंधांची मागणी, चिठ्ठा मुंशीविरुद्ध महिलांच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 02:29 PM2022-10-12T14:29:46+5:302022-10-12T14:30:35+5:30
आरोपी काही महिलांकडून गिफ्ट आणि पैसे घेऊनही ड्युटी हवी तशी लावून देत असे.
दक्षिण जिल्हा स्थित फतेहपूर बेरी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांनी आपल्याच ठाण्यातील चिठ्ठा मुंशीवर ( ड्युटी लावणारा ठाणे हवालदार) गंभीर आरोप केले आहेत. मनपसंत ड्युटी लावून देतो असे म्हणत या मुंशी महाशयांनी शारीरिक संबंध बनविण्याची मागणी केली. तसेच, अनेकदा महिलांवर दबावही टाकला आहे. ज्या महिला शारीरिक सबंध ठेवण्यास नकार देतात, त्यांना त्रास देऊन रजा नामंजूर करणे आणि पिळवूणक करण्याचे कृत्य या मुशींकडून होत असल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आरोपी काही महिलांकडून गिफ्ट आणि पैसे घेऊनही ड्युटी हवी तशी लावून देत असे. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील महिलांनी एकत्र येत दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि भ्रष्ट्राचार लाचलुचपत विभागाच्या विशेष आयुक्तांकडेही तक्रार दिली आहे. आयुक्तांनीही हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचेही सांगितले. ठाण्यात चिठ्ठा मुंशी हवालदार असल्याचं महिलांनी तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांचा विश्वास संपादित करत तो हवालदार चिठ्ठा मुंशी पदावर बसला आहे. महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील भाषा करत, शारीरिक संबंध बनविण्यासाठी दबाव टाकतो. तसेच, त्याचे न ऐकल्यास सुट्टी देणार नाही किंवा ड्युटीही त्रासदायक लावणार, अशी खुलेआम धमकीच देत असल्याचेही महिलांनी तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे. संबंधित मुंशी अधिकाऱ्यांना सांभाळतो, त्यामुळे त्याच्याविरुद्धच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याचेही पीडित महिला कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.