युवा उद्योजकाच्या वेबसाईटचा डाटा चोरून थेट ऑस्ट्रेलियातून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:01 PM2020-02-06T12:01:53+5:302020-02-06T12:02:57+5:30
युवा उद्योजकाच्या वेबसाईटचा डेटा चोरला
नांदेड : शहरातील सोमेश बालाजीराव झाडे (१९) या युवा उद्योजकाने तयार केलेल्या वेबसाईटचा डेटा चोरी करून त्याला २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली़ खंडणी न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ यातील एक आरोपी नाशिकचा तर दुसरा ऑस्ट्रेलियातील रहिवासी आहे़
कैलासनगर भागातील यश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सोमेश झाडे या युवा उद्योजकाने स्वत:ची वेबसाईट सुरु केली होती़ या वेबसाईटच्या माध्यमातून तो ऑनलाईन मार्केटिंग करीत होता़ आपल्या व्यवसायाचा व्याप वाढविण्यासाठी त्याचा अनेकांशी संपर्क आला़ मित्राच्या माध्यमातून नाशिक येथील योगेश भट्ट व त्यानंतर ऑस्ट्रेलियातील ग्लेन गोन्साल्विस या दोघांशी त्याची ओळख झाली़ त्यातून वेबसाईटमधील बरीचशी माहिती झाडे याने त्या दोघांना सांगितली होती़ दोघांनी कंपनीत भागीदार करावे म्हणून झाडे याला त्रासून सोडले होते़ त्यामुळे झाडे याने त्यांच्याशी संपर्क तोडला.
परंतु झाडे याच्या वेबसाईटचा बराचसा डाटा चोरून आपल्या फायद्यासाठी वापरत असल्याचे झाडे याच्या लक्षात आले़ याबाबत झाडे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी झाडे यालाच २० लाख रुपयांची खंडणी मागितली़ खंडणीची रक्कम न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली़ या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या झाडे याने सुरुवातीला भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी ही तक्रार घेतली नाही़ त्यामुळे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे धाव घेतली़ मगर यांनी प्रकरण समजून घेऊन सायबर सेलकडे सोपविले़ यानंतर नाशिकचा योगेश भट्ट अन् ऑस्ट्रेलियातील ग्लेन गोन्साल्विसविरुद्ध गुन्हा नोंद झाला.