अटक टाळण्यासाठी साडेतीन लाखाची मागणी; लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह निलंबित हवालदारावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:50 PM2021-08-10T21:50:31+5:302021-08-10T21:55:34+5:30
Bribe Case : याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार प्राप्त झाली असता पडताळणीमध्ये त्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले.
नवी मुंबई : अपहाराच्या गुन्ह्यातून अटक टाळण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व एका निलंबित हवलदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी साडेतीन लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी 1 लाख 40 हजार रुपये स्वीकारले होते. याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार प्राप्त झाली असता पडताळणीमध्ये त्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले.
एका व्यापाऱ्याच्या मालाचा अपहार झाल्याचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात गतमहिन्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक पंकज महाजन यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी एका संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. मात्र त्याची अटक टाळण्यासाठी त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जात होती. यासाठी हवालदार सुनील पवारमार्फत त्यांनी संशयीत आरोपीच्या मित्राला जबरदस्तीने मध्यस्थी केले होते. शिवाय त्याने मध्यस्थी न केल्यास त्याला देखील सहआरोपी करण्याची धमकी दिली जात होती.
त्यानुसार संशयित आरोपीची अटक टाळण्यासाठी व खोट्या गुन्ह्यात न गुंतवण्यासाठी महाजन व पवार यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 40 हजार रुपये स्विकारले होते. मात्र उर्वरित रकमेसाठी त्यांच्याकडून दबाव वाढल्याने तक्रारदार याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार हवालदार सुनील पवारला निलंबित करण्यात आले होते. तर महाजन विरोधात यापूर्वीच एक तक्रार आल्याने त्यामध्ये त्यांची बदली इतर ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशीत महाजन व पवार यांनी 1 लाख 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याद्वारे या दोघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.