व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत केली शरीरसुखाची मागणी; शेजारी राहणाऱ्या युवकाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 10:18 PM2020-10-14T22:18:51+5:302020-10-14T22:38:33+5:30
तरुणीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा
अमरावती : तरुणीचा कपडे बदलवित असतानाचा व्हिडीओ दाखवून आरोपीने तिचा विनयभंग केला. शरीरसुखाची मागणी करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना शहरात १० जानेवारी ते २४ जुलै २०२० दरम्यान घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला. २५ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी चेतन ऊर्फ गजानन सुभाष चौके (२३, रा. परिगणित कॉलनी) याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, विवाहतेचे लग्नापूर्वी नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय युवकाशी पुणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत असताना प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती आपल्या राहत्या घरी अमरावती येथे जानेवारी महिन्यात आली असता, तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या आरोपी चेतनने तिच्याशी जवळीक साधून ती कपडे बदलत असतानाचा त्याच्याकडे असलेला व्हिडीओ तिला दाखविला. बदनामीच्या भीतीपोटी घाबरलेल्या तरुणीने या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही. याचाच फायदा घेऊन त्याने तिचा विनयभंग केला. ती बदनामीपोटी ही बाब कुणाला सांगू शकत नव्हती.
तिचे नांदेडच्या तरुणाशी प्रेम असल्याने त्याच्याशी लग्नाची बोलणी सुरु होती. त्यामुळे तिने आरोपी चेतनकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिचे नांदेडच्या युवकाशी लग्न झाले. मात्र, लग्नानंतरही चेतन तिचा पाठलाग करीत राहिला त्याने नांदेड गाठून तिच्या सासरी जाऊन पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिला शरीरसुखाची मागणी करून त्याच्याकडे असलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. चेतनचे हे कृत्य सहन न झाल्याने अखेर त्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पीएसआय राजेश लेवटकर करीत आहेत.