राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव सांगून बिल्डरांकडे खंडणीची मागणी, पोलिसांकडे तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:38 PM2020-02-12T22:38:43+5:302020-02-12T22:39:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नावाखाली मोबाईलवरुन बिल्डरांसह काही कंपन्यांना धमक्या देऊन पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नावाखाली मोबाईलवरुन बिल्डरांसह काही कंपन्यांना धमक्या देऊन पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी आमदार टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आमदार टिंगरे यांच्या नावाने पैशाची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला असून मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
वडगावशेरी मतदारसंघातील काही बिल्डरांना एका मोबाईल क्रमांकावरुन आमदार टिंगरे यांच्याकडून बोलत असल्याचे सांगत पैशाची मागणी करण्यात आली होती. ज्या मोबाईल क्रमांकावरुन संबधित बिल्डरांना कॉल करण्यात आला होता, त्यावरील ट्रू कॉलर आयडीला एमएलए सुनिल टिंगरे असे नाव ठेवण्यात आले होते. मात्र, ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे पैशाची मागणी करण्यात आली तेच आमदार टिंगरे यांच्या परिचयाचे असल्याने त्यांनी या बाबत संपर्क साधून आमदार टिंगरे यांना विचारणा केली. त्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला.
बिल्डरांबरोबरच या मतदारसंघातील वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्यांमध्ये अशा पध्दतीने पैशाची मागणी केल्याचेही त्यानंतर समोर आले. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन संबधित व्यकतीची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा पध्दतीने कोणाकडून पैशाची मागणी आल्यास त्यांनी तात्काळ आमदार सुनिल टिंगरे यांना किंवा विश्रांतवाडी पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.