शस्त्राचा धाक दाखवत दरोडेखोरांनी लुटलं सौभाग्याचं लेणं; १७ तोळे सोनं केलं लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 06:17 PM2018-08-03T18:17:33+5:302018-08-03T18:19:05+5:30
१७ तोळे दागिन्यांसह लाखोंची रोकड दरोडेखोरांनी केली लंपास; दरोडेखोरांनी लुटले घर आणि दुकान
ठाणे - कडीकोयंडा तोडून घरात घुसून दरोडखोरांनी किराणा दुकानदाराचे तब्बल ८ लाख ७५ हजाराच्या रक्कमेसह १७ तोळे सोन्याचे दागिनेही लुटले आहेत. ही घटना भिवंडी शहरातील भादवडमधील एकविरा नगरमध्ये घडली. पांडुरंग म्हात्रे असे त्या लुटण्यात आलेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे.
भादवड येथील सोनाळे रोडवर पांडुरंग म्हात्रे यांचे निवासस्थान व किराणा दुकान आहे. ते आपली पत्नी व दोन मुलांसह घरातील पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये झोपले होते. गुरुवारी मध्यरात्री घराचा कडीकोयंडा तोडून घरात घुसलेल्या पाच दरोडेखोरांनी पहिल्या मजल्यावर झोपलेल्या दोन मुलांना शस्त्राचा धाक दाखवला. यावेळी मुलांनी आरडाओरडा केल्याने वडील पांडुरंग म्हात्रे जागे झाले. त्यामुळे दरडोखोरांनी त्यांना धमकावित कपाटाची चावी मागितली. मात्र, त्यांनी चावी न दिल्याने दरोडेखोरांनी कपाट लोखंडी हत्याराने उचकटीत कार विक्रीतून आलेली ७ लाख आणि इतर व्यवहाराचे १ लाख ७५ हजार रुपयांची रोकडसह पत्नी व मुलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चैन, बांगड्या असे १७ तोळ्याचे दागिने असा एकूण १४ लाख रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर लंपास झाले.
पहाटे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. सकाळी सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.