प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:47 AM2021-10-25T06:47:09+5:302021-10-25T06:47:23+5:30
वैष्णवी संजयसिंह गौर (२५) ही तरुणी एम.कॉम. झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देवीदास शेंडगे (२६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती.
नांदेड : शहरातील शारदानगर भागात प्रेमास नकार दिल्याने तरुणाने खंजरने तरुणीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर पलायनाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी लगेच पकडले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वैष्णवी संजयसिंह गौर (२५) ही तरुणी एम.कॉम. झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देवीदास शेंडगे (२६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती. दोघेही एकमेकांशी फोनवरून नेहमी बोलायचे तसेच भेटतही असत. शनिवारी सायंकाळी वैष्णवी ही मैत्रिणीसह एका कॅफेमध्ये बसलेली असताना आरोपी सुरेश शेंडगे हा त्या ठिकाणी आला. यावेळी मैत्रिणीसमोरच त्याने मला टाळत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आरोपी सुरेशला पकडण्यात आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
खंजीरने केले वार
रविवारी दुपारी वैष्णवी एकटी घरी असताना तो आला. त्यापूर्वी त्याने फोनवरून वैष्णवीशी संपर्क साधला होता. मला का टाळतेस म्हणून त्याने वैष्णवीशी पुन्हा वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात जवळील खंजरने वैष्णवीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला.