भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:15 IST2025-04-21T12:15:19+5:302025-04-21T12:15:53+5:30
UP Crime News: नौशाद सौदी अरेबियात काम करायचा आणि दहा दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता.

भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
उत्तर प्रदेशातील देवरिया येथे ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह ३७ वर्षीय नौशाद याचा असल्याचं बॅगेत सापडलेल्या पासपोर्टवरून निष्पन्न झालं आहे. प्रेमात अडथळा निर्माण झाल्यामुळे ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पत्नी आणि इतर तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशादच्या पत्नीचे त्याच गावातील तिच्या भाच्याशी प्रेमसंबंध होते.
पत्नीने नौशादच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या तारकुलवा पोलीस स्टेशन परिसरातील पाकरी पटखौलीजवळील एका गव्हाच्या शेतात टाकण्यात आला. भटौली गावातील रहिवासी नौशाद याने गावाबाहेर आपलं घर बांधलं होतं. जिथे त्याची ९ वर्षांची मुलगी, पत्नी आणि वडील अली अहमद राहतात.
नौशाद सौदी अरेबियात काम करायचा आणि दहा दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. हत्येनंतर ज्या ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह भरून फेकण्यात आला होता ती नौशादने सौदी अरेबियाहून आणली होती. हत्येनंतर पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसह मृतदेह ६० किलोमीटर अंतरावर फेकून दिला. मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरल्यानंतर तो टाकण्यासाठी गाडीचा वापर करण्यात आला.
रविवारी एक शेतकरी गहू कापणीसाठी यंत्र घेऊन त्याच्या शेतात आला. यावेळी त्याची नजर जवळच्या रिकाम्या शेतात एका ट्रॉली बॅगवर पडली. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. बॅगेत एक पासपोर्ट सापडला. पासपोर्टच्या मदतीने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान तिचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे.