अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:46 AM2022-02-25T07:46:11+5:302022-02-25T07:46:35+5:30
याच प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही पोलिसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची अभियान येथे बदली झाली आहे, तर याच प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही पोलिसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पसार पोलीस निरीक्षकाचा शोध सुरू आहे.
पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या विरोधात १९ फेब्रुवारी रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे हा गुन्हा सीआययूकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात कदम व जमदाडे यांना अटक करण्यात आली. गुरुवारी दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वसुली प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत असून, त्यानुसार सीआययूचे पथक तपास करत आहे.
- परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची पोलीस उपायुक्त अभियान येथे बदली करण्यात आली आहे. एलटी मार्ग पोलीस ठाणे त्यांच्याच अंतर्गत येते. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेचा अतिरिक्त कार्यभार सशस्त्र पोलीस विभागाचे शशिकुमार मीना यांना देण्यात आला आहे.
- मीना यांच्याकडे विशेष शाखा १ चा देखील अतिरिक्त कार्यभार होता.
- तो कोळे कल्याण विभागाचे उपायुक्त हेमराज रजपूत यांच्याकडे देण्यात आला आहे.