पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी घेतली याचिका मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:22 PM2018-07-06T15:22:31+5:302018-07-06T15:27:57+5:30
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराबाबत दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर-गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका गुरुवारी (दि.५ जुलै) मागे घेतली.
औरंगाबाद : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराबाबत दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर-गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका गुरुवारी (दि.५ जुलै) मागे घेतली. याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठात प्राथमिक सुनावणी झाली असता श्रीरामे यांच्या वकिलांनी वरील याचिका मागे घेत असल्याचे निवेदन केले.
एका तरुणीने २२ जून २०१८ रोजी पोलीस आयुक्तालयाच्या तक्रार निवारण केंद्राच्या ‘व्हॉटस्अॅप’नंबरवर श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने २७ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात श्रीरामे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा (क्रमांक १५४/१८) दाखल झाला आहे.
हा प्रथम माहिती अहवाल (गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका श्रीरामे यांनी अॅड. अभिषेक कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केली होती. अॅड. कुलकर्णी यांच्याकरिता अॅड. राजेंद्र एस. देशमुख यांनी काम पाहिले. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि अतिरिक्त सरकारी वकील संदीप महाजन यांनी काम पाहिले.