देसाईगंज पोलिसांनी पकडली साडेतीन लाखांची दारू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:43 PM2020-02-11T21:43:09+5:302020-02-11T21:46:47+5:30
सुमो वाहनही जप्त : लाखांदूर टी-पॉईंटवर पहाटेची कारवाई
देसाईगंज (गडचिरोली) : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमार्गे देसाईगंजकडे एका टाटा सुमो वाहनातून येत असलेली साडेतीन लाखांची देशी-विदेशी दारू देसाईगंज पोलिसांनी पकडली. ही कारवाई मंगळवारी पहाटे येथील लाखांदूर मार्गावरील टी-पॉईंटवर करण्यात आली. दोन आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे देसाईगंजचे ठाणेदार प्रदीप लांडे यांच्यासह त्यांचे पथक पहाटेच्या गस्तीवर असताना लाखांदूरकडून आलेली टाटा सुमो रेल्वे बोगद्याकडे जात होती. याचवेळी ब्रह्मपुरी मार्गाने येत असलेल्या पोलीस पथकाला त्या सुमोबद्दल संशय आल्याने त्यांनी ते वाहन थांबवून झडती घेतली असता त्यात देशी दारूचे ३८ बॉक्स (किंमत २ लाख २८ हजार) आणि विदेशी दारूचे १० बॉक्स (किंमत १ लाख २० हजार रुपये) अशा ३ लाख ४८ हजारांच्या दारूसह दोन मोबाईल आणि टाटा सुमो वाहन असा ५ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
या कारवाईत आनंद कडेर (२२) आणि संदीप चौधरी (२३) रा.कांपा टेंपा, नागभिड, जि.चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. याशिवाय आणखी एकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई पो.निरीक्षक प्रदीप लांडे यांच्यासह उपनिरीक्षक हर्षल नगरकर, नायक दीपक लेनगुरे, विजय नंदेहवार, तसेच गणेश बहेटवार, शंकर बंदे आदींनी केली.