पेपर फुटी प्रकरण : १० एजंटांमार्फत देशमुख फोडणार होता म्हाडाचे पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 07:32 AM2021-12-15T07:32:46+5:302021-12-15T07:33:56+5:30
उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा दिला होता सल्ला.
पुणे : जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा साेडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करून परीक्षार्थींना पास करणार होता. हा त्यांचा बदललेला प्लॅन होता.
४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाइल जप्त
सायबर पोलिसांनी डॉ. देशमुख याच्या खराळवाडी येथील घराची सोमवारी रात्री झडती घेतली. त्यात ४ पेन ड्राईव्ह, एक टॅब, एक मोबाइल सापडला आहे. हे साहित्य जप्त केले असून, पंचनामा करून पंचांसमोर ओपन करून पाहिल्यानंतर त्यामध्ये नक्की काय आहे हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
‘घरातील वस्तू’ कोडवर्ड
डॉ. प्रीतिश देशमुख याने काही एजंटांशी संधान साधले होते. त्यासाठी त्यांनी कोडवर्डचा वापर केला होता. त्यात त्यांनी ‘घरातील वस्तू’ असे सांकेतिक शब्दांचा वापर केला होता. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ होता. प्रीतिश याला ताब्यात घेतल्यानंतर काही एजंटांचे फोन आले होते. त्यात त्यांनी ‘घरातील वस्तू’ कधी मिळणार, अशी विचारणा केली होती. असे चौकशीत समोर आले आहे.
आरोग्य पेपरफुटीनंतर बदलला प्लॅन
देशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअर या कंपनीला म्हाडाची लेखी परीक्षा आयोजित करून तिच्या निकालापर्यंत सर्व कामांचे कंत्राट दिले होते. देशमुखने राज्यभरातील एजंट टोळीकडून सावज हेरण्यास सुरुवात केली. एका परीक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरविला. परीक्षार्थीमागे किती पैसे घ्यायचे हे एजंटवर सोपवले. उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्यास सांगितले होते. पुढे कंपनीच्या ताब्यात आल्यावर गुण भरून तो फेरफार करणार होता. परंतु तोपर्यंतचे पोलिसांनी माहिती लागल्याने बिंग फुटले.