‘ट्रायबल’ घोटाळा प्रकरण : धारणी पोलिसांत दोन तक्रारीनंतरही फौजदारी नाही, एसआयटीने पुरविले कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 07:26 PM2018-09-24T19:26:39+5:302018-09-24T19:27:15+5:30
आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये झालेला अपहार, घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा शिरस्ता सुरू आहे.
अमरावती : आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये झालेला अपहार, घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा शिरस्ता सुरू आहे. मात्र, धारणी पोलिसांत माजी प्रकल्प अधिकारी रमेश मांजरीकर यांच्याविरूद्ध दोन तक्रारी देऊनही फौजदारी दाखल केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून जणू दोषींना अभय मिळत असल्याचे वास्तव आहे.
‘ट्रायबल’ घोटाळ्यातील दोषींना कठोर शासन व्हावे, यासाठी माजी न्या. गायकवाड समितीच्या शिफारसीनुसार पोलिसांत तक्रारी नोदविल्या जात आहे. दोषींवर कारवाई करून घोटाळ्याचे पायमुळे निखंदून काढण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा माजी न्यायमूर्ती करंदीकर समिती गठित केली. त्याकरिता विशेष चौकशी पथक नेमले आहे. एसआयटीच्या पुढाकाराने ‘ट्रायबल’ घोटाळ्यातील दोषींविरूद्ध तक्रार दाखल करून पोलिसात फौजदारीचे सत्र सुरू आहे. त्यानुसार धारणी प्रकल्प कार्यालयाचे तक्रार अधिकारी शिवानंद पेढेकर यांनी एसआयटीने सादर केलेल्या यादीनुसार माजी प्रकल्प अधिकारी रमेश माजंरीकर यांच्या विरुद्ध पोलिसांत अपहार झाल्याप्रकरणी जुलै महिन्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांना आवश्यक कागदपत्रेदेखील १० आॅगस्टपूर्वीच सादर केली. मात्र, अद्यापही धारणी पोलिसांनी फौजदारी दाखल केली नाही. तर, दुसरीकडे धारणीचे माजी प्रकल्प अधिकारी मांजरीकर यांनी पोलिसात तक्रार होताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतल्याची माहिती आहे. रमेश मांजरीकर यांच्याविरूद्ध १० लाख रूपयांचे बोगस प्रशिक्षण आणि २५ लाखांचे पाईप वाटपात अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. धारणी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पोलिसांकडून एकाच फिर्यादीत कारवाई होत नसल्याने हतबल झाले आहे. मात्र, एसआयटीकडून अन्य दोषींची यादी आल्यास या घोटाळ्यातील अन्य दोषींवर कशी, केव्हा कारवाई होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणेदार बदलीने कारवाईला ब्रेक
धारणीचे ठाणेदार लहुजी मोहनडुले यांची बदली झाली. त्यांच्या जागी धारणीचे नवे ठाणेदार विलास कुळकर्णी हे आले आहेत. नव्या ठाणेदारांकडून आदिवासी विकास विभागाच्या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. मात्र, ठाणेदार बदलल्यामुळे अद्यापही घोटाळ्यातील दोषींविरूद् तक्रार नोंदविली असताना फौजदारी दाखल करण्यात आली नाही, हे विशेष.
आदिवासी विकास विभागाच्या घोटाळाप्रकरणी शासनस्तरावरून दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्यासाठी दबाव येत आहे. धारणी पोलिसात रमेश मांजरीकर यांच्या नावे वेगवेगळ्या दोन तक्रारी देण्यात आल्या असून,अद्यापही एफआयआर नोंदविण्यात आले नाही.
- शिवानंद पेढेकर,
सहायक प्रकल्प अधिकारी, धारणी