Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये अशी गेली आर्यन खानची पहिली रात्र; शेअर करावं लागलं अंथरूण-पांघरूण, मिळालं असं जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 10:02 AM2021-10-09T10:02:35+5:302021-10-09T10:06:51+5:30
Cruise Drugs Case : आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबई - क्रूझ ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या शाहरुख खानच्या मुलाला, अर्थात आर्यन खानला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आर्यन खानच्या वकिलाकडून मुंबईच्या किला कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो शुक्रवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र इतर कैद्यासोबतच आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. यादरम्यान आर्यन खानला कुठल्याही प्रकारची विशेष ट्रिटमेंट देण्यात आली नाही. (Aryan khan first night in prison )
कारागृहात आर्यनची पहिली रात्र -
ड्रग्स केस प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनने मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये एक रात्र काढली आहे. आर्यनला जेलमध्ये एका सामान्य कैद्याप्रमाणेच अन्न दिले गेले. याच बरोबर त्याला झोपण्यासाठीही सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच सुविधा देण्यात आल्या.
स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवले गेले -
आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
खाण्यासाठी मिळालं असं अन्न -
आर्यन खानला जेलमध्ये एका सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक मिळत आहे. कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला जेवणात मूंगाची डाळ, भात, पाले भाजी आणि गव्हाची पोळी (चपाती) देण्यात आली.
शेअर कराव्या लागल्या वस्तू -
आर्यन आणि अरबाज यांना तुरुंगात एकच पांघरून देण्यात आले. याच बरबोर त्यांना बेडशीट आणि उशीही एकच देण्यात आली आहे. यामुळे त्यांना या वस्तू शेअर कराव्या लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, बॅरेक क्रमांक 1 मध्ये केवळ एकच पंखा आहे. महत्वाचे म्हणजे, आर्यन खानला आता सोमवारपर्यंत जेलमध्येच राहावे लागणार आहे. सत्र न्यायालय बंद अल्याने जामीन अर्जही दाखल करता येत नाही. यामुळे पुढील प्रक्रिया न्यायालय सुरू झाल्यानंतरच सुरू होईल.