२०१९ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांचा सुळसुळाट; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:24 PM2018-12-20T15:24:37+5:302018-12-20T15:26:57+5:30
उच्च दर्जाचा कागद, हुबेहूब छपाई आणि पश्चिम बंगालमधून पुरवठा या समीकरणामुळे सीमेपलिकडे बनावट नोटांचे छापखाने पुन्हा सुरू झाल्याचे या कारवाईतून निदर्शनात आले आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा बाजारात आणण्याचा आरोपींचा मानस असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
मुंबई - गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दाणा बंदर येथून एका तरूणाला एक लाखांच्या बनावट नोटांसह अटक केली आहे. उच्च दर्जाचा कागद, हुबेहूब छपाई आणि पश्चिम बंगालमधून पुरवठा या समीकरणामुळे सीमेपलिकडे बनावट नोटांचे छापखाने पुन्हा सुरू झाल्याचे या कारवाईतून निदर्शनात आले आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा बाजारात आणण्याचा आरोपींचा मानस असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या रिंटू नाझी हुसेन शेख 30 याला खंडणी विरोधी पथकाने दाणा बंदर येथून मंगळवारी सांयकाळी अटक केली. झाडाझडतीत त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या 44 नोटा म्हणजेच 88 हजार आणि पाचशेच्या 34 नोटा म्हणजेत 17 हजार असे एक लाख पाच हजार रुपये आढळून आले. नोटांवरील उत्कृष्ट छपाईमुळे या नोटा खऱ्या की खोटय़ा हे सुरुवातीला समजत नव्हते. मात्र या नोटांवर एकच अनुक्रमांक असल्याने त्या बनावट असल्याची खात्री पटली. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मालदा येथील एका व्यक्तीने या नोटा देऊन त्या मुंबईत चलनात आणण्यास सांगितले होते. याबदल्यात त्याला 2 % कमिशन मिळणार होते, अशी माहिती अटक केलेल्या आरोपींने चौकशीत दिली. अटक आरोपी हा मुंबईत हमालीचे काम करत. न्यायालयाने त्याला 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.