देवेन भारती प्रकरण : बांगलादेशी घुसखोरीबाबत पुरावे नष्ट केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:35 AM2021-12-13T07:35:00+5:302021-12-13T07:35:23+5:30
रेश्मा खान संबंधित कागदपत्रे गायब
मुंबई : घुसखोर बांगलादेशी रेश्मा खान विरोधातील कारवाईवरून सहआयुक्त देवेन भारतीसह माजी सहाय्यक आयुक्त दीपक फटांगरे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यावरून खळबळ उडाली असताना, तिच्याविरोधात कारवाईसाठी दिलेली कागदपत्रेही मालवणी पोलिसांसह विशेष शाखेतून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. रेश्माविरोधात कुठलीही कारवाई होऊ नये म्हणून पुरावे नष्ट केल्याचा आरोपही तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षक दीपक कुरुलकर यांनी तक्रारीत केला आहे.
कुरुलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रेश्मा खानने योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करत बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पुरावे मालवणी पोलीस ठाण्यात देऊनही तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी भारती यांचे गुन्हा दाखल करू नये म्हणून आदेश असल्याचे सांगत कारवाई केली नाही. तसेच तत्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी याबाबत पाठपुरावा करू नये, यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार मालवणी पोलिसांनी रेश्मा खानसह देवेन भारती आणि फटांगरे तसेच अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतही गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
काय आहे प्रकरण?
गुन्हा दाखल होण्यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी कुरुलकर यांनी माहिती अधिकाराद्वारे आय शाखा आणि मालवणी पोलिसांकडे रेश्मा खान हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जमा केलेल्या कागदपत्रांसह केलेल्या कागदपत्रांची मागणी केली.
मात्र, ५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या उत्तरात मालवणी पोलीस ठाण्यातील २०१८पर्यंतचा अभिलेख नष्ट केला असल्याचे उत्तर देत माहिती देणे टाळल्याचेही कुरुलकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच विशेष शाखेतही कागदपत्रे नसल्याची माहिती मिळाली. पुढे १ डिसेंबर रोजी परिमंडळ ११ कडे अर्ज करत माहिती देण्याची विनंती केली.
त्यांनी याबाबत माहिती देण्याचे आदेश देऊनही सहाय्यक आयुक्तांकडून पुरावा नष्ट केल्याची माहिती दिली. त्यामुळे रेश्मा खानविरोधात दिलेली कागदपत्रे, पुरावे नष्ट केल्याचा संशयही त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वर्तविला आहे.